चंद्रपूरच्या युवकांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाची दखल जग घेईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:30 AM2019-07-06T00:30:48+5:302019-07-06T00:31:57+5:30
जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध,......
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध, नाविन्यता आणि त्याला व्यावसायिक निर्मितीचे अधिष्ठान देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोवेशन, इनक्युबेशन ट्रेनिग सेंटरची चंद्रपूरमध्ये सुरुवात होणार आहे. चंद्रपूर गव्हर्नमेंट कॉलेज आॅफ इंजीनियरिंग व टाटा टेक्नॉलॉजीच्यामध्ये या प्रकल्पाचे प्रणेते राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी सामंजस्य करार झाला.
अशा प्रकारचे सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोवेशन, इनक्युबेशन ट्रेनिग सेंटर (सीआयआयआयटी ) भारतात तीन ठिकाणी आहे. महाराष्ट्रात हे पहिलेच सेंटर चंद्रपूरमध्ये निर्माण होणार असून टाटा टेक्नॉलॉजीकडून अशा पद्धतीच्या तीन सेंटरची निर्मिती महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी टाटा टेक्नॉलॉजीतर्फे १८९ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंग, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष आनंद भदे, टाटा ट्रस्ट लिमिटेडच्या शिक्षण विभागाचे ग्लोबल डायरेक्टर पुष्कराज कौलगुड, प्रोजेक्ट डायरेक्टर सुशील कुमार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.जी. भुतडा उपस्थित होते.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा असे केले जाते. टाटा टेक्नॉलॉजीच्या मदतीने निर्माण झालेल्या सीट्रीपलआयटी यंत्रणेचा उपयोग करून महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला चांदा सर्वांसाठी मार्गदर्शक जिल्हा बनेल, जगाला हेवा वाटेल असे नावीन्यपूर्ण प्रयोग संकल्पना या ठिकाणी तयार होतील. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी केलेले प्रयोग जगामध्ये प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. टाटासारख्या व्यवस्थापनाला मोठया प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असते. या ठिकाणी तयार होणाºया कुशल मनुष्यबळाला लगेचच संधी देण्याचे कामदेखील टाटा ट्रस्ट करेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
टाटा टेक्नॉलॉजीच्या एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष आनंद भदे यांनी चंद्रपूरमध्ये हा प्रकल्प सुरू करताना आनंद होत असून यामागे खरी प्रेरणा आणि मार्गदर्शक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याचे त्यांनी सांगितले.