चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; प्लॉस्टिकवर केली भाताची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:02 AM2017-11-25T11:02:33+5:302017-11-25T11:04:16+5:30
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़
विलास गुरनुले यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन सुधारित पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला होता़ त्यानुसार नवीन तंत्रज्ञान घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर शहर गाठले़ तेथील काही प्रयोगांची पाहणी करून प्लॉस्टिकवर धानाची लागवड करण्याचा निर्णय घेतला़ पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे परहे भरुन रोवणी केली जाते़ परंतु सदर शेतकऱ्याने शेतातील बांधामध्येच प्लास्टिक टाकली. प्लास्टिकला मध्ये छिद्र पाडून धानाची लागवड केली. यामध्ये रावणी करण्याची गरजच राहिली नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे धानामध्ये कचरा उगवला नाही़ कचऱ्याचे प्रमाण अतिशय अल्प होते़ रोवणी व निंदणाचा खर्च कमी झाला़ शिवाय पाणी कमी असतानाही उत्पन्नाची हमी मिळाली़ रासायनिक खताच्या वापराऐवजी गुरनुले यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला़ प्लास्टिकच्या वापरामुळे जमिनीने ओलावा धरुन ठेवला़ यातून गांडुळ खत तयार झाले़ हे खत धानाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरले़ यातून रोपाच्या फूटवे जोमाने वाढले़ ही शेती करण्यासाठी लागवड खर्चही अत्यल्प आला. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माच्या विद्या मानकर, सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राचे प्रा़ शेंडे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. बागुल, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी पी. के. मोतीकर आणि कृषी विभागाच्या अन्य अधिकारी तसेच विविध ठिकाणाहून शेकडो शेतकऱ्यांनी गुरनुले यांच्या शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली़ विलास गुरनुले यांनी मोहरा धानाचीही लागवड केली़ विशेष म्हणजे, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले़ या नाविण्यपूर्ण प्रयोगाची तालुक्यातील कृषी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे़