ग्रामिण भागात नाविन्यपूर्ण कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:51+5:302021-08-01T04:25:51+5:30
चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील ...
चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील कंपन्याच्या सामाजिक दायित्व भागीदारीतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतमध्ये हे अभियान मागील चार वर्षांपासून राबविले जात आहे. या चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्ताली सेठी यांनी घेतला. या अभियानांतर्गत ग्रामपरिवर्तकांनी नाविन्यपूर्ण कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाच्या ग्रामकोष निधीच्या माध्यमातून सात कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहे. याकरिता थेट ग्रामपंचायतीला अबंध निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये शाश्वत कृषी विकास, महिला सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास, पिण्याचे पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, स्वच्छता, शाश्वत ऊर्जेस चालना, समाज प्रबोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर अभियानामार्फत कार्य केले गेले. यामध्ये गावात वाचनालये, डिजिटल शाळा, अंगणवाडी, स्वछता अभियान, आरोग्य शिबिर, वृक्षसंवर्धनाचे, कचराकुंड्या, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्धता आदी कामे करण्यात आली, या सर्वांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मीत्ताली सेठी यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मूल, चंद्रपूर, पोंभुर्णा, जिवती, कोरपना, चिमूर, नागभीड तालुक्याचे गट विकास अधिकारी, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल व सर्व ग्रामपरिवर्तक उपस्थित होते .