त्या दोघांच्या मृत्यूची चौकशी थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:51+5:302021-05-17T04:26:51+5:30
वरोरा : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी टेमुर्डा परिसरातील एकाच गावातील तीन व्यक्तींनी गावठी बनावटीची दारू प्यायले. त्यात दुसऱ्या दिवशी दोघांचा ...
वरोरा : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी टेमुर्डा परिसरातील एकाच गावातील तीन व्यक्तींनी गावठी बनावटीची दारू प्यायले. त्यात दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले. दारू विषारी असल्याची चर्चा गावपरिसरात आहे. मात्र या प्रकरणाची कुठलीही चौकशी पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेली नाही.
टेमुर्डा परिसरातील एका गावातील सहा व्यक्ती नजीकच्या गावाच्या शिवारात एक विहीर बांधकाम करण्याकरिता मागील काही दिवसांपासून जात होते. सायंकाळी ते रोज गावठी बनावटीची दारू घेऊन येत व पीत होते, अशी चर्चा परिसरात केली जात आहे. गावठी बनावटी दारू दुसऱ्या व्यक्तीची असल्याने आपली दारू रोज कुणीतरी घेऊन जाते, त्यामुळे ज्याची दारू होती त्याने काहीतरी दारूमध्ये घातल्याची चर्चा परिसरात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी तिघांनी तिथलीच दारू प्यायल्याचे समजते व दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु याबाबत कुठलीही तक्रार करण्यात आली नाही. ग्रामस्थही या विषयावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे दोघांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या दोघांसोबत गेलेल्या तिसऱ्या व्यक्तीची चौकशी केल्यास त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे मानले जात आहे.
कोट
सदर प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला प्राप्त झाली नाही.
- सुधीर बोरकुटे, ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन