आयटीआयमधील गैरप्रकाराची चौकशी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2017 12:45 AM2017-03-01T00:45:08+5:302017-03-01T00:45:08+5:30
येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर समिती गठित
चंद्रपूर: येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ताराशक्ती आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन केला होता. याप्रकरणी तक्रारीनंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीने चौकशी पूर्ण केली आहे.
याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे करण्यात आली होती. साई आयटीआय येथे आयटीआयच्या परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. ताराशक्ती आयटीआयचे परीक्षा केंद्रसुद्धा येथेच देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीला झालेला पेपर तब्बल दोन तास उशिराने देण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले, त्यांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करण्यात आली. तर ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांनीकेला होता. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यांना लघुशंकेसाठी बाहेरही येऊ दिले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
शिवाय परीक्षा केंद्र बदलवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी पत्रपरिषदेत केली होती. आयटीआयचे प्राचार्य आणि केंद्रप्रमुख यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.
या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सहा सदस्यीय चमूने याप्रकरणाची चौकशी केली. या चौकशीमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारऱ्यांकडे सादर केला आहे. साई आयटीआयच्या परीक्षा कंद्रप्रमुखावर कारवाई शिफारस जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आल्याची माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)