कामगारांच्या तक्रारीनंतर झाली चौकशी
By admin | Published: January 10, 2016 01:18 AM2016-01-10T01:18:39+5:302016-01-10T01:18:39+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना विदर्भ प्रहार संघटनेने फसविल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.
चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना विदर्भ प्रहार संघटनेने फसविल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.
या संदर्भात कामगारांच्या तक्रारी आल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव व सरकारी कामगार अधिकारी यांनी चौकशी केली. विदर्भ प्रहार कामगार संघटनेने स्वत:च्या संघटनेच्या नावाचा उल्लेख असलेले नोंदणी फार्म छापून अनधिकृतरीत्या प्राईम सेक्युरिटी एजंसीकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून घेत असल्याचे त्यांनाही चौकशीत आढळून आले.
विशेष म्हणजे, सदर नोंदणी फार्म निरीक्षकाद्वारे स्वीकारून संघटनेला मंडळाची पावती दिली जात असल्याचेही कामगार अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांना ही बाब गंभीर स्वरुपाची वाटल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर-गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना कळविले व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार नोंदविली. विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या या प्रतापामुळे भविष्यात या सुरक्षा रक्षकांनी कामाची मागणी केल्यास मंडळासमोर अडचण निर्माण होऊ शकते व त्यांच्यामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.
विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केवळ सुरक्षा रक्षकांचीच फसवणूक केली नाही तर त्यांनी शासनाचीही दिशाभूल केली असल्याची बाब कामगारंनी आपल्या तक्रारीतून मांडली असून कामगारांनी या संदर्भातील निवेदन कामगार मंत्री, पालकमंत्री, प्रधान सचिव कामगार मंत्रालय मुंबई, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)