भद्रावतीत पाच शाळा व महाविद्यालयांची तपासणी पथकाद्वारे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:54 AM2021-02-28T04:54:56+5:302021-02-28T04:54:56+5:30
भद्रावती : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या संबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन शाळा व महाविद्यालयांमध्ये होत आहे का ...
भद्रावती : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या संबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन शाळा व महाविद्यालयांमध्ये होत आहे का नाही, हे पाहण्यासाठी तपासणी पथकाद्वारे भद्रावती शहरातील पाच शाळा व महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली.
यामध्ये लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नीळकंठराव शिंदे महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे ही पाहणी करण्यात आली.
तपासणी पथकातील गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी विजय भोयर, केंद्रप्रमुख मोरेश्वर विदये यांनी शाळा, महाविद्यालयातील वर्गावर्गामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार महेश शितोळे यांच्या आदेशान्वये तपासणी पथक गठित करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली की नाही, याबाबतही विचारणा करण्यात आली. प्रलंबित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ चाचणी करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
सोबतच स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन, हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझर आदी बाबींची तपासणी करण्यात आली. यानंतर प्रत्येकदिवशी किमान दोन शाळा व महाविद्यालये या पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केलेला अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.