मोबाईल अॅपद्वारे होणार पाण्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:13 PM2018-09-26T23:13:40+5:302018-09-26T23:13:55+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर केली जाते. पावसाळयापूर्वी मार्च ते मे व पावसाळयानंतर आक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत ही पाणी नमुने तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील पाणी स्त्रोत दूषित होऊ नये आणि झालेच तर त्यावर उपाययोजना लवकरात लवकर व्हावी, याकरिता तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना स्वच्छ, शुध्द व शाश्वत पाणी मिळावे, याकरिता शासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केली जाते.
यात ही पाणी नमुने तपासणी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील जिल्ह्यात असलेल्या सात प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग मोबाईल अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या मार्फत जिल्हयातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश व रेखांश यांची गाव व ठिकाण अशी अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आलेली आहे. स्त्रोतांची परिपूर्ण माहिती १ आक्टोंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत.
पाणी पुरवठा योजना, विहीर, हातपंप तसेच बंद पडलेले स्त्रोत अशा एकूण १४ हजार ९७१ स्त्रोतांबद्दलची माहिती एकाच वेब पोर्टलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील कार्यरत ग्रामसेवक, पंचायत समिती अंतर्गत असणारे समूह समन्वयक व गट समन्वयक, जलसुरक्षक, जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा सल्लागार यांना मोबाईल अॅप हाताळणीचे प्रशिक्षण जिल्हा पाणी गुणवत्ता कक्षामार्फत देण्यात आले आहे. ग्रामसेवक, जलसुरक्षक किंवा संबधित अधिकारी हे त्या स्त्रोताजवळ जावून मोबाईल अॅपद्वारे त्याची नोंद करुन पाणी नमुने गोळा करुन ते नजिकच्या प्रयोगशाळेत पोहते करुन देतील.
यामुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने दूहित आहेत, कोणते पाणी नमुने पाणी गुणवत्ता पूर्ण आहेत, याची अचुक माहिती या अॅपमुळे मिळणे सोईस्कर होणार आहे.
या मोबाईल अॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अघावत माहिती आहे. या अॅपचा वापर करताना मोबाईल डाटा व जीपीएस प्रणाली सुरु केल्यानंतर स्त्रोतांच्या १० मीटरच्या अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो. त्यानंतर संबधित व्यक्ती त्या स्त्रोतांचे फोटो काढून स्त्रोतात पाणी आहे का, स्त्रोत चालु किंवा बंद आहे, हे अॅपद्वारे दर्शविता येते. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अघावत होणार आहे.
-ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी,
(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर.