गोंडपिपरीचा अनुप झाला विक्रीकर निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:48 PM2018-05-06T23:48:22+5:302018-05-06T23:48:35+5:30
सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे. त्याने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
मुळचा गोंडपिपरी येथील रहिवासी असलेल्या अनुप मुरलीधर भोयर याने १३५ गुण मिळवित विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २५१ विक्रीकर निरीक्षकाच्या पदाकरिता काही दिवसांपुर्वी परीक्षा पार पडली. २ मे रोजी या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अनुपने यश संपादन करीत जो स्पर्धेत टिकेल, तोच यशाला गवसणी घालेल, हे दाखवून दिले.
अनुपचे वडील मुरलीधर भोयर हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अनुपचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण गोंडपिपरी येथे झाले. त्यानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे वास्तव्यास राहून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तो पुणे येथे खासगी शिकवणी लावून स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यास करीत असताना त्याने अनेक विभागाची परीक्षा दिली. मात्र अपयशच आले. यानंतरही अनुप खचून गेला नाही. त्याने अभ्यास सुरूच ठेवला आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलाच्या यशाने वडील भारावून गेले असून ही बातमी कानावर पडताच मित्र मंडळीनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असून अनेक जण गाव सोडून शहरातील अभ्यासिकेत तासन्तास अभ्यास करताना दिसतात. मात्र दोन-चार वर्षे अभ्यास करूनही यश न आल्याने काही जण लघु उद्योगाकडे वळले आहेत. मात्र ध्येय गाठण्यासाठी सततचे अपयश पचवून यश मिळविणारच, असा ठाम निश्चय करून अभ्यासात सातत्य ठेवल्याने आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करू शकलो, अशी प्रतिक्रिया अनुप भोयरने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.