वराती ऐवजी त्याची प्रेतयात्राच निघाली

By admin | Published: March 10, 2017 01:57 AM2017-03-10T01:57:24+5:302017-03-10T01:57:24+5:30

विवाह वेदीवर चढण्याआधीचे जे काही सोपस्कार असतात, ते सोपस्कार पूर्ण करीत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.

Instead of his announcement, his funeral went out | वराती ऐवजी त्याची प्रेतयात्राच निघाली

वराती ऐवजी त्याची प्रेतयात्राच निघाली

Next

नागभीड: विवाह वेदीवर चढण्याआधीचे जे काही सोपस्कार असतात, ते सोपस्कार पूर्ण करीत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे वरातीऐवजी प्रेतयात्रा काढण्याची पाळी नातेवाईकांवर आली. मन सुन्न करणारी ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील मांगरुड येथे घडली.
महेश लक्ष्मण बावणे या २६ वर्षीय युवकाची ही शोकांतिका आहे. चिमूर तालुक्यातील बोळधा (हेटी) येथील महेशचा सिंदेवाही तालुक्यात डोंगरगाव (सा.) येथील एका युवतीशी विवाह निश्चित झाला. त्यानंतर भावी संसाराच्या सुखद स्वप्नांची अनुभूती तो घेत असतानाच प्रथेनुसार एक भाग असलेला विवाहपूर्व ‘हारगाठी’साठी तो डोंगरगावकडे सकाळीच एका मित्राला सोबत घेऊन निघाला.
वाटेत मांगरुड येथे महेशची बहीण राहते. तिची भेट घेवून समोर जाऊ या विचाराने त्याने मांगरुडमार्गे गाडी टाकली. पण त्याला काय माहिती की समोर काळ आपली वाट पाहत आहे.
मांगरुडला जाणाऱ्या एका अरुंद रस्त्याने जात असताना समोरुन जाणाऱ्या बैलगाडीला सावध करावे, या हेतूने महेशने हॉर्न वाजविला आणि येथेच घात झाला. हॉर्नच्या आवाजाने बैल बिचकले आणि त्यांचा तोल गेला. तेवढ्यात महेशची दुचाकी बैलगाडीजवळ आली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. महेश जागीच गतप्राण झाला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Instead of his announcement, his funeral went out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.