विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By admin | Published: July 15, 2015 01:10 AM2015-07-15T01:10:08+5:302015-07-15T01:10:08+5:30
शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
केवळ ३.४६ टक्के विमा : २ हजार ९९९ शेतकऱ्यांना नाममात्र लाभ
सावली : शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या कृषी पत धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडून पीक विमा काढला जातो. मागील वर्षीच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याबदल्यात कबाल इंश्युरन्स कंपनीने हेक्टरी केवळ ५२० रुपये विम्यापोटी सानुग्रह मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. सावली तालुक्यातील २ हजार ९९९ शेतकऱ्यांनाच या विमा योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र प्रत्येक शेतकऱ्याने पीक विम्याकरिता जेवढी रक्कम भरली. त्यापेक्षाही कमी रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गतवर्षीच्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असुनही प्रत्यक्षात ३.४६ टक्केच विमा परतावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी जेवढी रक्कम पीक विम्यासाठी भरतो, तेवढीच रक्कम शासनाकडूनसुद्धा भरली जाते.
सावली: कबाल इन्शुरन्स कंपनीने एकरी केवळ २०८ रुपये जमा केले आहेत. यावरुन शासनाचे शेतकऱ्याविषयाचे उदासीन धोरण स्पष्ट होत आहे. हेक्टरी १५ हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसारच पीक विमा काढला जातो. त्या धोरणानुसारच कबाल इन्शुरन्स कंपनीने ५२० रुपये (३.४६ टक्के) विमा परतावा केल्याचे स्पष्ट होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांच्याच बँक खात्यात सदर पीक विम्याची तटपुंजी रक्कम जमा झाली आहे. यातही इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.
संपूर्ण सावली तालुक्याची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असतानाही केवळ सावली परिसरातीलच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे सावली तालुक्यात १५ ते १७ हजार शेतकरी कुटुंब असताना केवळ दोन हजार ९९९ शेतकरी कुटुंबानाच पीक विम्याची नाममात्र रक्कम देऊन शासनाला कोणता हेतू साध्य करायचा आहे, याबद्दल शेतकऱ्यामध्ये सांशकता आहे. (तालुका प्रतिनिधी)