७० हजार शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:03 PM2019-01-27T23:03:31+5:302019-01-27T23:03:58+5:30
गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३० हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३० हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करीत असताना गरीब शेतकरी, शेतमजुरांच्या जिवित्वाची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्याची घोषणा आज मी करत असून जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी, शेतमजूर यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून आयुष्यभराचा विमा काढला जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीे केली. प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला ते संबोधित करीत होते.
पावसाळी वातावरण असतानादेखील मोठ्या संख्येने विद्यार्थी व सामान्य नागरिक आजच्या प्रजासत्ताक कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलीस ग्राऊंड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी स्वातंत्र्य सैनिक सर्व क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आजच्या महत्त्वपूर्ण संबोधनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवात केली. कधीकाळी आपणदेखील विद्यार्थिदशेत या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे भाषण ऐकायला गर्दीत येत होतो. आपल्या राज्यघटनेमध्ये शक्ती आहे की एका सामान्य माणसालादेखील या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संबोधित करण्याची संधी दिली जाते. आपल्यापैकी एकाला भविष्यात ही संधी मिळणार आहे,अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ही वाघांची आणि पराक्रमाची भूमी असल्यामुळे येथील युवकांनी वाघाप्रमाणे पराक्रम गाजवावा व भारतामध्ये या जिल्ह्याचे नाव अग्रकमाने घेतले जाईल,असे कार्य करावे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचे सत्कार व कौतुक केले.
यावेळी त्यांनी कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी जिल्हा मध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांचेही स्मरण यावेळी त्यांनी केले.या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक नारायण चालुलकर, पोलीस शिपाई प्रिती बोरकर व वैशाली पाटील यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल गजानन पुरुषोत्तम पांडे, अश्विनी रामदास करकाडे व स्वरुप विजय काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग व मंगला आसुटकर यांनी केले.
तालुकास्थळी वाचनालय
मिशन शौर्य गाजवणाऱ्या मुलांचे कौतुक करताना ना. मुनगंटीवार यांनी ज्यांनी कधी विमान बघितले नाही, अशा आदिवासी विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीवरील एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नावदेखील अजरामर केले. यावेळी त्यांनी युवकांनी मिशन सेवा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासकीय नोकरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा टक्का वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवे क्रीडा संकूल उभारणार
मिशन सेवासोबतच आता मिशन शक्तीच्या माध्यमातून भारत मातेच्या चरणी आॅलम्पिक मेडल मिळवणाºयात चंद्रपूर-गडचिरोलीचे विद्यार्थी असावे, यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये ज्युबिली हायस्कुलच्या मागे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे क्रीडा संकुलाचे लवकरच उदघाटन करीत असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी घोषणा केली.
पालकमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घोषणा
जे गरीब दारिद्र रेषेच्या खाली नाहीत. परंतु गरीब आहेत, अशांसाठी मिशन दीनदयाल अन्नधान्य स्वावलंबन योजना
भगवे शिधापत्रिकाधारकांनादेखील यापुढे दोन-तीन रुपये दराने धान्य
जिल्ह्यातील दिव्यांगासाठी मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजना.
रात्रपाळीत काम करणाºया महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष उपक्रम
महिला बचत गटांसाठी हिरकणी बचत योजना
प्रत्येक तालुक्यामध्ये सशक्त युवा निर्मितीसाठी दीड कोटीची व्यायाम शाळा उभारण्यात येईल
पळसगाव आमडी, चिचडोह आदी सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण करणार
टाटा ट्रस्टच्या मदतीने पालकमंत्री संगणक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेची व्याप्ती पूर्ण १५ तालुक्यांमध्ये वाढविण्यात येणार
जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी 'आयएसओ ' तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी वाचनालय उभारणार