अंतरगाव - निमगाव क्षेत्र विकासापासून उपेक्षित
By Admin | Published: June 17, 2016 01:10 AM2016-06-17T01:10:27+5:302016-06-17T01:10:27+5:30
अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव,
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आश्वासने दिल्यानंतर त्याची पूर्तता नाही
गेवरा : अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांचे मागील चार वर्षांपासून बिघडलेले अर्थकारण आणि या भागातील लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रति तुटलेली नाळ, या सर्व कारणांंमुळे हे क्षेत्र विकासापासून कायम उपेक्षित आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल या भागातील शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
या जिल्हा परिषद क्षेत्रात दोन पंचायत समिती क्षेत्र असून दोन पक्षाचे पंचायत सदस्य आहेत. निमगाव पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर अंतरगाव - पालेबारसा भाजप आणि जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे. मागील कित्येक वर्षाचा विधान सभेचा राजकीय आलेख बघितल्यास राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच्या विरुध्द पक्षाचे या क्षेत्राचे आमदार असतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समांतर राजकीय व्यासपीठ नाही. तरीही पक्षीय राजकारण करून शेतकऱ्यांना भुरळ घातली जाते. आपल्या पक्ष कार्यात त्यांना ओढून मागे मागे धावत ठेवले आहे. या भागातील स्वत:ला राजकीय कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विसरून राजकीय चष्मा वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे तो दुखणं विसरुन राजकीय गुलाल उधळण्यातच धन्यता मानू लागला. हळूहळू राजकीय सत्तेच्या मोहापोटी या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रश्नांवर काम करण्याचे साधे सौदार्ह दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील राजकर्त्यांची राजकीय प्रतिमा फारशी उजळू शकली नाही. येथील मतदार जनता ओरडू लागली आहे. या भागातील शिक्षण, आरोग्य, सिंचन व्यवस्था, यामुळे शेतकऱ्यांच्या अंंधारलेल्या वाटा आता अधिकच काळोखमय झाल्या आहेत.
यावर्षी आसोला मेंढा तलावात गोसेखुर्दचे पाणी अंतरगाव - पालेबारसा या पंचायत समिती क्षेत्रातून मुख्य कालव्याद्वारे सोडण्यात आले. त्याचा फायदा कोणत्याही गावांना झाला नाही. उलट आणेवारीचा परिणाम महसुली परिमंडळामुळे येथील १५ ते १६ गावांना सोसावा लागत आहे. त्याच सोबत निमगाव- विहिरगाव पंचायत समिती क्षेत्रातील सहा गावांना व्याहाड परिमंडळामुळे कायम त्रास सोसावा लागतो. अर्थात पाथरी, राजस्व परिमंडळ आसोला तलाव, व्याहाडच्या लाभ क्षेत्राबाहेरही जि.प. क्षेत्र मोडत असल्याने खऱ्या अर्थाने आतापर्यंत कोणत्याही स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेच्या प्रतिनिधीने या भागातील हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली नाही.
कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोयरसुतकच लोकप्रतिनिधींना असल्याचे दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीवर आता लक्ष केंद्रीत करुन येणाऱ्या आगामी जि.प., पंचायत समिती निवडणुकांत गुडघ्याला बांशिग बांधून असणारे आणि ज्यांची कारकिर्द आता संपुष्टात येणार आहे, त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची योग्य वेळ येवून ठेपली आहे. विद्यमान आमदारांनी तरी या क्षेत्राकडे गांभीर्याने बघून विकास साधावा, अशी अपेक्षाही जनता व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)