राज्यात मध्यावधी निवडणूक होणे अटळ
By admin | Published: November 29, 2014 01:05 AM2014-11-29T01:05:48+5:302014-11-29T01:05:48+5:30
राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत.
बल्लारपूर : राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत. मात्र, दुबळे व अधांतरीसरकार कधीही पडून मध्यावधी निवडणूक होऊ शकते. त्यामुळे आपणाला नव्या दमाने आणि विजयी होऊच, या इर्षेने आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे व पुन्ही सत्ता काबीज करायची आहे, असे सांगून यापुढे राज्यात नक्की आपलीच सत्ता येणार, असा ठाम विश्वास विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
आ. वडेट्टीवार हे विधानसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते झालेत त्यानिमित्त त्यांचा बल्लारपूर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. रजनीताई हजारे होत्या. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, कविता खरतड, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, दिलीप माकोडे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आबीद अली, चंद्रपूर महानगरपालिकेचे सभापती रामू तिवारी, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष कमलेश शुक्ला, मेघा भाले, चंद्रपूर न.प. चे गटनेता संतोष लहामगे, शांता बहुरिया, भास्कर माकोडे, हरिश गेडाम, फारूखभाई आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. शाल व श्रीफळ देऊन वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाने आपल्या एक महिन्याच्या शासन काळात जनतेला कसे निराश केले, याची जंत्री वडेट्टीवार यांनी मोठ्या खुबीने मांडली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना, त्यांनी ५४० पत्र विविध मागण्यांसंबंधात दिले होते व त्याकरिता आंदोलनाची भाषा ते बोलत होते. त्या मागण्या पूर्ण करण्याची पाळी आज त्यांच्यावर आली आहे. भाजपा सत्तेवर बसल्यानंतर त्यातील वा इतर कोणतीही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही व करूही शकणार नाही. सत्तेवर नसतांना काहीही बरळता व मागता येते. सत्तेवर आल्यानंतर ते करता येत नाही हे भाजपाच्या नेत्यांना आता कळू लागले आहे. असा टोला त्यांनी मुनगंटीवार यांना मारला. एलबीटी, टोलमुक्ती या सर्व बाबींवर भाजपा आता घुमजाव करीत आहे, याचा विचार लोकांनी करायला हवा आणि या सरकारला जाब विचारायला हवा असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)