कोरोना लसीकरणाला इंटरनेट नेटवर्कचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:49+5:302021-08-25T04:32:49+5:30
सास्ती : कोरोनाच्या निर्मूलनाकरिता युद्धपातळीवर लसीकरण सुरू असले तरी मात्र ग्रामीण भागात लसीकरणासाठी इंटरनेट नेटवर्कअभावी ऑनलाइन नोंदणीच होत नसल्याने ...
सास्ती : कोरोनाच्या निर्मूलनाकरिता युद्धपातळीवर लसीकरण सुरू असले तरी मात्र ग्रामीण भागात लसीकरणासाठी इंटरनेट नेटवर्कअभावी ऑनलाइन नोंदणीच होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. केंद्रावरील कर्मचारी मात्र आपल्या मोबाइलमधून अनेकांची नोंदणी करून लसीकरण पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी शासन व प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. नागरिकांना सुविधा व्हावी. त्यांना अडचण होऊ नये किंवा योग्य पद्धतीने कामे व्हावी म्हणून ऑनलाइन पद्धतीचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जात आहे. त्यात कोरोना रुग्णाला ऑनलाइन बेड उपलब्धता, कोरोना चाचणीकरिता ऑनलाइन नोंदणी, लसीकरणाकरितासुद्धा ऑनलाइन नोंदणी गरजेची आहे. या ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात असल्याने अनेक कामे योग्य पद्धतीने होतही आहेत. मात्र ग्रामीण भागात या सर्व सुविधांना इंटरनेट नेटवर्कची आडकाठी निर्माण होत आहे.
राजुरा तालुक्यातील सातरी या लसीकरण केंद्रावर आलेल्या लाभार्थ्यांना इंटरनेट नेटवर्क अभावाचा चांगलाच सामना करावा लागला. नोंदणी करण्याकरिता बराच कालावधी लागत होता. अनेकांची नोंदणी होत नसल्याने लस न घेताच परत जावे लागल्याने लसीपासून अनेक लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले. या ठिकाणी उपलब्ध ३०० डोसपैकी केवळ १८३ डोस लावण्यात आले, तर ११७ डोस शिल्लक राहिल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यातही केंद्रावरील कर्मचारी आपल्या-आपल्या मोबाइलवरून लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. इंटरनेटअभावी नागरिकांसोबतच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत चनाखा येथील सी.एच.ओ. स्नेहा गिरडकर यांनी व्यक्त केले.
240821\img_20210823_154442.jpg
लसीकरण केंद्रावर नेटवर्क च्या शोधात कर्मचारी असे बाहेर बसून होते