एटीएमची अदलाबदल करून गंडविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:20 AM2023-02-16T11:20:22+5:302023-02-16T11:26:16+5:30
७२ एटीएम जप्त, तिघांना अटक
चंद्रपूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठांना गंडविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७२ एटीएम, ४३ हजार रुपये रोख जप्त केले आहेत. जोगिंदरसिंह चंदरसिंह बिट्टू (२६), रा. पुठ्ठी सामान हरियाणा, राजेश रेलुराम माला (४५), रा. हंसी हरियाणा, पुनीत शिवदत्त पांचाल (३२), रा. जिंद हरियाणा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
२५ नोव्हेंबर रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथील वामन गोसाई दिघोरे ब्रह्मपुरी येथील एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित अनोळखी व्यक्तींनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत केली. दरम्यान, दिघोरे यांना अत्यंत चपळाईने दुसरे एटीएम कार्ड दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही. तीन दिवसांनी परत एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते एटीएम कार्ड दुसरेच असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी बँकेत जाऊन आपले खाते तपासले तेव्हा दहा हजार रुपये वडसा येथील एटीएममधून काढल्याचे व ७४ हजार ९९७ रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यात वळते केल्याचे लक्षात आले.
दिघोरे यांनी ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक बाबीचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या नेतृत्वात एपीआय प्रशांत ठवरे, मुकेश गजबे, नितीन भगत, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, विजय मैद, अजय कटाईत आदींनी केली.
बुटीबोरी येथून केली अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि विविध तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी हरियाणा राज्यातील हंसी जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गेले. मात्र, तोपर्यंत ते पसार झाले होते. या गुन्ह्यातील आरोपी आदिलाबादकडे अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी निघाले, अशी माहिती पोलिसांना ११ फेब्रुवारीला मिळाली. त्यांच्या मागावर पोलिस पथक रवाना झाले. तेव्हा आरोपी चारचाकी वाहनाने आदिलाबाद येथून नागरपूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बुट्टीबोरी पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनी नाकाबंदी केली. त्यानंतर त्या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७२ एटीएम, ४३ हजार रोख, तीन भ्रमणध्वनी जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायधीशांनी पोलिस कोठडी सुनावली.