राजीव गांधी सभागृहात पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती
By admin | Published: March 29, 2017 01:48 AM2017-03-29T01:48:14+5:302017-03-29T01:48:14+5:30
मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.
१७ प्रभागासाठी दोन गटात निरीक्षकांनी घेतली उमेदवाराची परीक्षा
चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातील ६६ उमेदवार निवडण्यासाठी येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी १७ प्रभागासाठी दोन गटात उमेदवारांची परीक्षा घेतली. काँग्रेसचे येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया, डॉ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, गजानन गावंडे, युवा नेते राहूल पुगलिय यांनी प्रभाग क्रमांक ९ ते १७ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांची परीक्षा गोंदियाचे आमदार व निरीक्षक गोपालदास अग्रवाल, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, जिया पटेल, गिरीश पांडव, शकुर नागाणी, प्रमोद तितरमारे, डॉ.आसावरी देवतळे यांच्या पॅनलने घेतली.
आजच्या मुलाखतीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी समर्थकांसह राजीव गांधी सभागृहात मोठी गर्दी केली. शेकडोवर इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षकांना आर्जव केली. विद्यमान नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, मीना खनके, सुनिता लोढिया यांच्यासह प्रवीण पडवेकर, अशोक नागापूरे, प्रशांत दानव यांचा उमेदवारी मागणाऱ्यात समावेश होता. काही तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीला हजेरी लावली. (स्थानिक प्रतिनिधी)
काँग्रेसची एकता कायम राहणार काय?
अलीकडेच नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राजुरा नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुत्र ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानपानाचे नाटक घडले. आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात पार पडल्या. यावेळी सर्वच नेते गटतट विसरून एकाच ठिकाणी आले. अपवाद फक्त आमदार वडेट्टीवार यांचा होता. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साऱ्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली, तर सत्ताधारी पक्षाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची आजची एकता निवडणुकीपर्यंत कायम राहणार काय? असा प्रश्न मतदारात चर्चिला जात आहे.