धानोडे दाम्पत्याने दिला माणुसकीचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:05 PM2017-10-08T22:05:39+5:302017-10-08T22:05:51+5:30
तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतून निघून गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थी नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतून निघून गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थी नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात आढळला. त्याच परिसरात हॉटेल चालविणाºया एका दाम्पत्याला त्या मुलावर संशय आल्याने त्याची विचारपूस करून त्याला त्या दाम्पत्याने मुलाला सोबत घेवून भद्रावती पोलीस स्टेशन गाठले व ठाणेदार बी.डी. मडावी यांच्या स्वाधीन करून माणुसकीचा परिचय दिला. त्या दाम्पत्यांची त्या बालकाविषयीची हुरहुर व आपुलकी लक्षात घेत ठाणेदार मडावी यांनी दाम्पत्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून त्यांच्यातील माणुसकीला दाद दिली.
वरोरा तालुक्यातील आशी या गावातील रहिवाशी असलेला संकेत श्रीहरी उईके हा १४ वर्षीय बालक भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेत नवव्या वर्गात शिकत होता. तो ७ सप्टेंबरला रात्रीच्या वेळेस आश्रमशाळेतून निघून गेला. तो दिसला नाही तेव्हा तेथील अधीक्षकांनी त्याच्या गावी व इतरत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली व सर्वत्र बेपत्ता झाल्याची चर्चा होती. संकेतने नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात काही दिवस आश्रय घेतला.
जवळचे पैसे संपल्यानंतर त्याची उपासमार होऊ लागल्यानंतर त्याने ५ आॅक्टोबरला रेल्वेस्टेशन समोरच असलेल्या ओंकार दस्तुरी धनाडे व अर्चना ओंकार धनाडे या दाम्पत्याकडे जावून त्याने हॉटेलमध्ये कामाची मागणी केली. या दाम्पत्याने तू बाल कामगार असल्यामुळे तुला काम देता येणार नाही, असे म्हटले. मात्र त्यांना संशय बळावल्याने मुलाची सखोल चौकशी केली. तेव्हा तो विद्यार्थी निघून आल्याचे लक्षात आले.
त्यांनी प्रसंगावधान राखून मुलाला इतरत्र न सोडता जेवण देवून त्याला सोबत घेवून ५ आॅक्टोबरला भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदारांनी त्यांच्या आईला बोलाविले व स्वाधीन केले. धनाडे दाम्पत्यांच्या या माणुसकीने ठाणेदारही प्रभावित झाले व त्यांनी त्यांचा माणुसकीचा आदर करीत सत्कार केला. त्यावेळी ठाणेदार बी.डी. मडावी, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, सुनील इनमुलवार, महेंद्र इंगळे, भीमराव पडोळे तसेच मुलाची आई व त्याचे नातेवाईक मंडळींची उपस्थिती होती.