लाचखोर मंडल अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:29+5:302021-04-08T04:28:29+5:30
भद्रावती : तालुक्यातील नंदोरी आणि चंदनखेडा या भागातील शेतजमीन वेकोलिमध्ये जाणार असल्याची चर्चा होताच शेतकऱ्यांकडून फेरफार करून देण्याच्या ...
भद्रावती : तालुक्यातील नंदोरी आणि चंदनखेडा या भागातील शेतजमीन वेकोलिमध्ये जाणार असल्याची चर्चा होताच शेतकऱ्यांकडून फेरफार करून देण्याच्या नावाखाली येथील मंडल अधिकारी प्रशांत नरेंद्रसिंग बैस हे पैशाची मागणी करत होते. याच प्रकरणात लाच घेताना त्यांना रंगेहात अटक केली होती. बैस यांनी याच माध्यमातून करोडोंची माया जमवली आहे. त्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी भाकपा जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
नंदोरी सजातील कोंढा, चालबर्डी, कोंडाळी, हरदाडा (रिठ) किलोनी, खंडाळा (रिठ), टाकळी, वडाळा, आष्टी (रिठ), डोंगरगाव खडी, गोटाळा, भटाळी, नंदोरी, विस्लोन, पळसगाव हा भाग प्रस्तावित वेकोली (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणीकरिता संपादित केला जाणार आहे. या भागातील शेतजमीन मालक आपल्या नावावरील शेती आपल्या कुटुंबियांच्या नावे करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शेतीची मोजणी करुन शेतीचे भाग करुन नावावर करुन घेतात. परंतु, मंडल अधिकारी बैस हे पैसे घेऊन कागदोपत्री तुकडे पाडून फेरफार करत होते. अशाच तक्रारीवरुन त्यांना रंगेहात अटक केली होती. तसेच मंडल अधिकारी पाटाळा सजात असताना रेती तस्करांकडूनही त्यांनी करोडोंची माया गोळा केली. त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव राजू गैनवार, लिमेश माणुसमारे, सुनील रामटेके, सागर भेले, मुकेश कांबळे आदी उपस्थित होते.