चिमूर-वरोरा रस्ता अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:12 AM2019-05-04T00:12:26+5:302019-05-04T00:13:53+5:30
चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमूरला जोडणारे उमरेड - वरोरा या राष्ट्रीय महामागार्चे काम खासगी कंत्राटदाराकडुन सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर-वरोरा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पयार्यी रस्ता तयार करण्यात आला असून या रस्तावर माती, मुरुम व काळी गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावर पाणी व रोलरने दबाई न केल्याने गिट्टी पुर्णत: उखडली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या गिट्टीमुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. उमरेड- चिमुर-वरोरा रस्त्याचे काम पूर्ण होण्यात आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
नियोजनाचा अभाव
चिमूर ते वरोरा या ५० किमी रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर हा पूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल ५० किमीचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. हाच रस्ता थोडा-थोडा खोदून काम केले असते, तर वाहन धारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रीया प्रवाशांमध्ये आहे.
दोन युवकांचा बळी
चिमूर-वरोरा चौपदरी रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत धिमी आहे. मागील दोन महिन्यांपासुन काम बंद आहे. त्यात रस्त्यावर पुलासाठी खोदलेल्या खाड्यामुळे शेगाव व खामगाव येथील युवकांना अपघातात जीव गमवावा लागला.
दुचाकी चालकाची कसरत
या रस्त्यावर माती, मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना गॉगल, स्कॉर्प असणे गरजेचे झाले आहे. अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन अपघातही घडले आहे.