किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्र्यांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:23 PM2018-07-22T22:23:36+5:302018-07-22T22:23:53+5:30
राज्यातील गड - किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लवकरच शासननिर्णय घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने इको - प्रोच्या शिष्टमंडळाने आमदार नाना श्यामकुळे यांच्या पुढाकारात विधानभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेउन इको - प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील गड - किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लवकरच शासननिर्णय घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने इको - प्रोच्या शिष्टमंडळाने आमदार नाना श्यामकुळे यांच्या पुढाकारात विधानभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेउन इको - प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले.
इको - प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी संपूर्ण अभियानाची माहिती असलेली सचित्र पुस्तिका देऊन किल्ला स्वच्छता अभियानाची माहिती दिली. चंद्रपूर येथील किल्ला स्वच्छता अभियान राज्यातील किल्ला स्वच्छता मोहिमेसाठी मॉडेल ठरेल, असे मत यावेळी पर्यटनमंत्री रावल यांनी व्यक्त केले. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ला परकोट स्वच्छता अभियान मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. ११ किलोमीटरच्या भव्य परकोट असलेला पण आता पडझड आणि घाण झालेला चंद्रपूर स्थित किल्ला ‘इको - प्रो’ या स्वंयसेवी संघटनेने अपार श्रमांनी जवळपास पूर्ण स्वच्छ केला आहे. या अभियानात इको - प्रो चे कार्यकर्ते दररोज नियमित श्रमदान करीत आलेत.
यावेळी इको - प्रोच्या शिष्टमंळात बंडू धोतरे, सुमित कोहले, हरीश मेश्राम, सुनिल मिलाल, सुनिल लिपटे यांचा समावेश होता.