बांबू कटाईच्या कामात स्थानिक मजुरांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:21 AM2020-12-27T04:21:07+5:302020-12-27T04:21:07+5:30
मध्य चांदा वन प्रकल्प विभागीय कार्यालय बलारशाह अंतर्गत तोहोगाव वनपरिक्षेत्रात सध्या बांबू व अन्य झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत. ...
मध्य चांदा वन प्रकल्प विभागीय कार्यालय बलारशाह अंतर्गत तोहोगाव वनपरिक्षेत्रात सध्या बांबू व अन्य झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत. कोरोना काळात मजुरीपासून वंचित असलेल्या स्थानिक रोजगारांना कामामुळे मोठा आधार मिळणार होता. परंतु, स्थानिक मजुरांना डावलून परप्रांतीय मजुरांना विशेष वाहनाने येथे आणून ही कामे करून घेत आहेत. या मजुरांना शासकीय दराप्रमाणे मजुरी न देता कामे करून घेतले जात आहे. सध्या कोरोना सारखे भयावह संकट असतानाही या परप्रांतीय मजुरांची माहिती संबंधित अधिका-यांनी जिल्हाधिकारी, पोलीस, महसूल विभाग व स्थानिक ग्रामपंचायतला दिली नाही. मजुरांना जंगलातच लहानशा झोपड्या उभारून ठवल्या. तिथे पिण्याचे पाणी व आरोग्याची तपासणी नाही. या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा नेहमी संचार असतो. अशा असुरक्षित वातावरणात कामे करवून घेतले जात आहेत, याबाबत या वनपरिक्षेत्र कार्यालयातील क्षेत्र सहायक विपुल आत्राम यांच्याशी संपर्क साधला. मात्र, काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
मंजूर कार्ययोजनेपेक्षा जादा कामे
हे क्षेत्र कान्हाळगाव अभयारण्य क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. त्यामुळे हे क्षेत्र वन विकास महामंडळाचे ताब्यातून जाणार आहे. याचा परिणाम म्हणून कार्ययोजन मंजूर कामापेक्षा नियमबाह्य कामे केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनेचे अमलदास कोटनाके यांनी केली आहे.