तिच्या पालकांच्या सत्कारासाठी घरी आले आयपीएस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:25+5:302021-07-10T04:20:25+5:30
फोटो ब्रह्मपुरी : वृत्तपत्रांच्या माध्यमातून तिच्या यशामागच्या संघर्षाची कहाणी वाचली आणि एक आयपीएस अधिकारी थेट तिच्या घरी गेले ...
फोटो
ब्रह्मपुरी : वृत्तपत्रांच्या माध्यमातून तिच्या यशामागच्या संघर्षाची कहाणी वाचली आणि एक आयपीएस अधिकारी थेट तिच्या घरी गेले व तिच्या आईवडिलांचा सत्कार केला.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन या नदीकाठालगत असलेल्या गावातील मोनाली दिलीप ढोरे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीची केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड झाली. ज्या रस्त्यांनी पायी चालणे कठीण आहे. त्या रस्त्यांवरून पहाटेच्या काळ्याकुट्ट अंधारात एकट्या मुलीने धावण्याचा सराव केला. अडचणी आणि संकटे भरपूर होती, मात्र परिस्थितीसोबत संघर्ष करीत त्या मुलीने देशसेवेचा व्रत हाती घेत सैन्यदलात भरती होण्याचा निर्धार केला. आणि तिची केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड झाली. आता ती तामिळनाडू येथे ट्रेनिंग घेत आहे. ही बाब ब्रह्मपुरी शहरात जन्माला आलेले २०१६ च्या बँचचे महाराष्ट्र कँडरचे आयपीएस अधिकारी पवन बन्सोड यांना माहीत झाली. पवन बन्सोड हे सध्या राज्य राखीव पोलीस दल गट १३ चे कमांडिंग ऑफिसर म्हणून देसाईगंज, जि.गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
त्यांना सदर बाब कळताच त्यांनी थेट रणमोचन येथे मोनालीच्या घरी जाऊन तिच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. एक आयपीएस अधिकारी आपल्या घरी आले या समाधानाने मोनालीच्या आईवडिलांचे मन भरून आले. यावेळी डीवायएसपी जांभूळकर, पोलीस निरीक्षक ए. एन. रूपनारायण, पोलीस कल्याण अधिकारी पी. के. मिश्रा, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, जीवन बागडे, नेताजी मेश्राम, गोवर्धन दोनाडकर, राहुल मैंद, नंदु गुड्डेवार उपस्थित होते.
बॉक्स
ग्रामीण भागातील मुलींनी घ्यावी प्रेरणा : डॉ. पवन बन्सोड
ग्रामीण भागातील अनेक मुलींना देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल व्हायची इच्छा असते. मात्र त्यांच्यामध्ये गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी त्या मागे पडतात. मोनालीकडून प्रेरणा घेत आता अन्य मुलींनी सुद्धा सैन्यदलात दाखल होण्यासाठी पुढे यावे. मनात कसलाही न्यूनगंड ठेवू नये, असे मत यावेळी आयपीएस डॉ. पवन बन्सोड यांनी व्यक्त केले.
090721\img-20210709-wa0060.jpg
मोनालीच्या आईवडिलांचा सत्कार करताना