लोखंड चोर टोळीचा उच्छाद
By admin | Published: January 10, 2015 10:50 PM2015-01-10T22:50:53+5:302015-01-10T22:50:53+5:30
जिल्ह्यात लोखंड चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील एक लोखंडीसाहित्य विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा मुद्दमाल लंपास केला.
तळोधी(बा.) : जिल्ह्यात लोखंड चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील एक लोखंडीसाहित्य विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा मुद्दमाल लंपास केला.
दरम्यान, ग्राम रक्षकाच्या सतर्कतेने नागभीड पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांच्या ताब्यातील ट्रक पकडला. चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र या टोळीतील तिघेजण फरार झाले. नागभीड पोलिसांचे एक पथक टोळीचा शोध घेण्यासाठी नागपूरकडे रवाना झाले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री तळोधी येथील रमेश बावणकर यांच्या मालकीच्या लोखंडी साहित्य विक्री दुकानासमोर एमएच ४०-६४९९ या क्रमांकाचा ट्रक उभा होता. गस्तीवर असलेला ग्रामरक्षक गुरखा उर्फ जगतसिंग ठाकूर याला त्या ट्रकचा संशय आल्याने चोरट्यांना हटकले. मात्र प्रसंगावधान राखून चोरट्यांनी ट्रकसह प्रथम सिंदेवाहीकडे व नंतर तळोधी मार्गे नागभीडकडे पलायन केले. जगतसिंगने लगेच यासंदर्भात नागभीड पोलिसांना माहिती दिली. नागभीड पोलिसांनी पाठलाग करून नवखळा गावाजवळ ट्रक पकडला. परंतु टोळीतील तिघेजण पळून गेले. तर ट्रकचालक पोलिसांच्या हाती लागला. यापूूर्वी सिंदेवाही तसेच तळोधी येथे लोखंडी साहित्य विक्रीचे दुकाने फोडून साहित्य लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात याच टोळीचा हात असावा, अशी शंका आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये ३ टन सळाखी सापडल्या. (शहर प्रतिनिधी)