मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय
By admin | Published: June 6, 2016 01:57 AM2016-06-06T01:57:00+5:302016-06-06T01:57:00+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेकडून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणातून पाण्याची उचल करीत
दुर्गापूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणातून पाण्याची उचल करीत आहे. याकरिता टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यावरील एअर व्हॉल्व्हमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
या गळत्या बंद करण्यासाठी वीज केंद्राने वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने गेल्या कित्येक वर्षापासून येथून संततधार पाणी वाहत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पाणी आणि कोळश्याच्या आधारावर विजेची निर्मिती केली जाते. वीज केंद्राला विजेच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. याकरिता वीज केंद्राने खास इरई धरणाचे बांधकाम केले आहे. येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील सात संच व ऊर्जानगर वसाहतीला पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या धरणात आहे. हे धरण केवळ पावसाळ्यात आलेल्या पावसाच्या भरवशावर भरल्या जाते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे त्यात अनेकदा जलसाठा होेत नाही. धरण तुडुंब भरो किंवा न भरो यातून चंद्रपूर शहराला पाणी देणे बंधनकारक आहे. यासाठी धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १५ ते १८ किलोमिटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यावर ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. येथून पाण्याचा पुरवठा होत असताना हवेसोबत काही प्रमाणात सतत पाणी बाहेर फेकल्या जाते. मात्र कोयना गेटपासून तुकूम येथील खत्री कॉलेजपर्यंतच्या या तीन किलोमिटरपर्यंतच्या जलवाहिनीवर सहा ते सात एअर व्हॉल्व्ह आहेत. यामधून गेल्या अनेक वर्षापासून सतत आवश्यकतेपेक्षा कितीतरी पट जास्त प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
वीज केंद्राला अविरत वीज निर्मिती करण्यासाठी थेंब-थेंब पाण्याची बचत करावी लागते. त्यामुळे त्यांच्या जलवाहिनीवरील गळत्या ते तात्काळ बंद करतात. उन्हाळ्यात धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खालावते. हे थांबविणे फार कठीण आहे. मात्र गळत्या बंद करून धरणातील पाण्याची सहज बचत करता येते. बाष्पीभवनाद्वारे निर्माण होणारी पाण्याची तुट जलवाहिनीवरील गळत्या बंद करून भरून काढता येते. मात्र हे महानगरपालिकेच्या अद्यापही डोक्यात आले नाही.
याबाबत वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांची भेट घेतली असता, या गळत्या बंद करण्याबाबत आयुक्तांना पत्र देऊन जलवाहिनीवर मीटर बसविण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या मिटरमुळे धरणातून चंद्रपूर शहराला किती पाण्याचा पुरवठा होत आहे, याची माहिती मिळते. याशिवाय गळत्यांमधून किती पाण्याचा अपव्यय होत आहे. याची सुद्धा माहिती जाणून घेता येते. यावरून गळत्या बंद करून पाण्याचा अपव्यय टोळता येतो. मात्र महानगरपालिका याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही क्षणी वीज केंद्राला फटका बसण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)