मूलमधील सिंचन क्षमतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:32 PM2018-07-22T22:32:26+5:302018-07-22T22:33:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिंचन क्षमता वाढली आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र वाढण्यास विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी हा पुर्णत: शेती उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्योगाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सन २०१७-२०१८ वर्षात जलयुक्त शिवार या अभियानाला विशेष महत्व देत विविध विभागाअंतर्गत कामे मंजूर केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाद्वारे २२८ तर म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत ५४ अशी २८२ कामे प्रस्तावित केली. त्यापैकी २५१ कामे पूर्ण करण्यात आली आहे. पंचायत समिती मूल अंतर्गत १० कामे प्रस्तावित होती. त्यापैकी संपूर्ण कामे पूर्णत्वास आली आहेत. पाटबंधारे विभागाअंतर्गत ७ कामे प्रस्तावित होती त्यातील ६ कामे पूर्णत्वास आली. जिल्हा परिषद सिंचाई विभाग अंतर्गत सर्वच ५ कामे पूर्ण करण्यात आली. वनविभागातील १७ कामांपैकी केवळ सहा कामे पूर्ण करण्यात आली.अशी एकूण ३२१ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र काही विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे काम पुर्णत्वास नेता आले नाही. कृषी विभाग, वनविभाग काही प्रमाणात कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कामाची पूर्तता ६८.६०४ टक्के पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद आहे.
सन २०१६-१७ या वर्षात महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे, ही योजना अंमलात आणली. या योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सिंचनाची क्षमता वाढविण्यास मदत झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी २०३ शेततळे मूल तालुक्यात तयार करण्यात आले. या शेततळ्यामुळे मागील वर्षी १३५ टी. सी. एम. पाणी साठा निर्माण होऊन सिंचन क्षमता वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विविध योजनेमार्फत सिंचनाची कामे करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. यात मूल तालुक्यात कोसंबी, चक कन्हाळगाव, उथळपेढ, करवन, मारोडा, सोमनाथ, डोंगरगाव, कोरंबी, चक घोसरी, चक बेंबाळ, बोरघाट, नांदगाव, या १२ गावात प्रामुख्याने कामे करण्यात आली. कृषी विभाग, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, जि. प. सिंचाई विभाग, वनविभाग आदी यंत्रणेकडून ३२१ प्रस्तावित कामांऐवजी २७८ कामे पूर्ण केल्याने ८०२ टी. सी. एम.क्षमता वाढली. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे. जनजागृतीसाठी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांनी प्रयत्न केले.