चिचाळा परिसरातील सहा गावात सिंचन सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:02+5:302021-02-25T04:36:02+5:30
पाणी वापर समित्या गठित भोजराज गोवर्धन, मूल : सुमारे २३ कोटी रुपये खर्च करून मूल तालुक्यातील चिचाळा आणि परिसरातील ...
पाणी वापर समित्या गठित
भोजराज गोवर्धन,
मूल
: सुमारे २३ कोटी रुपये खर्च करून मूल तालुक्यातील चिचाळा आणि परिसरातील सहा गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजनेचे काम पूर्णत्वास आले असून, योजनेचे पाणी वाटप करण्यासाठी चार पाणी वाटप समित्या तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक समितीची निवड अविरोध करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील चिचाळा, हळदी, ताडाळा, दहेगाव, मानकापूर, गोठणगाव रिठ आणि वेडी रिठ या गावातील शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी सिंचनाची समस्या कायम होती. सदर बाब राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडली, आ. मुनगंटीवार यांनी चांदा ते बांदा या विशेष कार्यकमांतर्गत २३ कोटी रुपये मंजूर केले आणि कामाला सुरुवात झाली. अवघ्या सहा महिन्यांत सदर योजनेचे काम पूर्णत्वास आले. या योजनेमुळे सुमारे १३४७ हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून, काही भागात दुबार पेरणीलाही गती आली आहे.
योजनेच्या सिंचन व्यवस्थापनाकरिता योजनेखाली सिंचन क्षेत्राची चार भागात विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक क्षेत्रासाठी लाभधारकांच्या पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहे. अविरोध संस्था गठित करण्यात आल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक संस्थेला १५ हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता सं. बा. सोनेकर, मूलचे उपविभागीय अभियंता एस. एन. आयलनवार, शाखा अभियंता सुप्रिया चवरे, योजनेचे बांधकाम करणाऱ्या एन. एन. के. कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रशांत राठोड उपस्थित होते. गठित केलेल्या सर्व संस्थांना जलसंपदा विभागाकडून क्षेत्र हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. काळे यांनी मार्गदर्शन केले.