सिंचनाचा उडाला बोजवारा !
By Admin | Published: July 9, 2015 12:59 AM2015-07-09T00:59:36+5:302015-07-09T00:59:36+5:30
गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना बंधारे मोठा आधार देत असतात.
निधी धूळ खात : आठ महिन्यात कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना पाच वर्षातही अपूर्ण
चंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना बंधारे मोठा आधार देत असतात. सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध योजनातून सिंचनाची कामेही मंजूर केली जात आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे समोर करुन कंत्राटदार, ग्रामपंचायतींची सिंचनाच्या कामातही चालढकल सुरू आहे. त्यांच्या कामाचे करार आता रद्द करण्यात आले. आता तर कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे असले तरी सिंचनाचा मात्र बोजवारा उडाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत सिंचनाची कामे केली जातात. जिल्ह्यात १ हजार ६७८ मामा तलाव, ६३९ कोल्हापुरी बंधारे, ८५ लघु पाटबंधारे तलाव आणि १ हजार १० सिमेंट प्लग बंधारे आहेत.
इंग्रज काळातील माजी मालगुजारी तलावांची संख्याही मोठी आहे. मामा तलावासह कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी डागडुजीची मोहीम सिंचाई विभागाला राबवावी लागत आहे.
विदर्भ संगम सिंचन योजना, जिल्हा निधी, शेषफंडातून अन्य योजनातून दुरुस्तीची कामे केली जातात. २००९ ते २०१० या दरम्यान सिंचाई विभागाने मामा तलाव दुरुस्ती, सिमेंट प्लग बंधारे, कॅनल दुरुस्ती, माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्या. या दोन्ही वर्षात ४६ कामांच्या निविदा निघाल्या. जवळपास कोट्यवधींची ही कामे होती. ही कामे प्रामुख्याने ग्रामपंचायती, सुशिक्षित बेरोजगार आणि कंत्राटदारांनी घेतली. या कामाचा कालावधी सहा महिने, आठ महिने असा होता. मात्र, पाच वर्षांचा काळ लोटत आला, तरी अजूनही कामे सुरूच झाली नाहीत. वेगवेगळी कारणे पुढे करून ग्रामपंचायती, कंत्राटदारांनी सिंचनाची कामे थांबविली आहेत. कामे सुरू करण्याबाबत वारंवार स्मरणपत्र देण्यात आले. मात्र, स्मरणपत्रांनाही कंत्राटदारासोबत ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली. यामुळे कोट्यवधींची सिंचनाची कामे रद्द करण्यात आली. कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारसही विभागाने केल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
बंधाऱ्यात पैसा जिरला, मात्र पाणी अडले नाही
राजुरा : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात सिंचनाच्या नवीन कामासोबतच जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसह गाळ उपसा व खोलीकरणाचे कामे करण्यात येत आहे. या माध्यमातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न रंगविले, पण अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मागील वर्षीचे अनेक बंधारे बुजगावणे ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. चार्ली गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. यापूर्वी हजारो रुपये खर्च करून दुरुस्तीसह खोलीकरण करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांच्या ठोस नियोजनाअभावी व तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचला नसल्याने लाखोंचा निधी वाया गेला, पैसा जिरला, मग पाणी कुठे पळाले? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. नदीपट्टा परिसरातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चार्ली गावाजवळील नाल्यावर बंधाऱ्याची श्रृंखला तयार करण्यात आली आहे. एका बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे टोक पुढल्या बंधाऱ्यापर्यंत राहील व प्रत्येक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतील व यातून सिंचनाची व्यवस्था व पाण्याच्या पातळीत वाढ होईल या कल्पनेतून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या साखळीतील शेवटच्या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचला नसल्याचे वास्तव आहे. मागील आठवड्यातील संततधार पावसाने या बंधाऱ्याच्या बांधकामातील ढिसाळपणा उजागर झाला आहे. बांधकामाच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याचा पायाच कमकुवत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि याच पाईपमधून सारे पाणी पळाल्याने बंधारा केवळ बुजगावणे ठरला. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा हा परिणाम असून अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरच नियोजन केल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षी या बांधकामासाठी लाखोचा खर्च करण्यात आला असून यावर्षी गाळ उपस्यासह खोलीकरणात हजारो रुपयांचा चुराडा झाला.