इरईचे खोलीकरण अयोग्य पध्दतीने
By Admin | Published: June 5, 2016 12:41 AM2016-06-05T00:41:49+5:302016-06-05T00:41:49+5:30
चंद्रपुरकरांची जीवनदायीनी असलेल्या इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून नागरिकांनी रेटून धरली होती.
पर्यावरण दिनी जलसत्याग्रह : बेशरमाची झाडे लावून करणार निषेध
चंद्रपूर : चंद्रपुरकरांची जीवनदायीनी असलेल्या इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून नागरिकांनी रेटून धरली होती. या मागणीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी इरई नदीच्या खोलीकरणाला व रुंदीकरणाला प्रारंभ केला. परंतु खोलीकरण योग्य न झाल्यामुळे नदीचे कालव्यात रुपांतर होत असल्याचा आरोप वृक्षाईचे कुशाब कायरकर यांनी केला आहे. त्यामुळे या कामाला विरोध दर्शवण्यासाठी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता शहरातील शेकडो नागरिक व महानगरातील संस्था दाताळा पुल येथे इरई जल सत्याग्रह करुन बेशरमाची झाडे लावून निषेध नोंदविणार आहे.
इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करताना रुंदीकरण ९० मीटर (३००) व सिंचन विभागाने खोलीकरण किमान १० फुट करणे अनिवार्य असताना रुंदीकरण ३० मीटर (१०० फुट) व खोलीकरणाच्या नावावर सपाटीकरण केले. यामुळे चंद्रपूरकरांना पुन्हा एकदा पुराच्या खाईत लोटण्याची स्थिती प्रशासन व सिंचन विभागाने निर्माण केली आहे. पुर्वीच चारोळ पुलाच्या नदी पात्रातील एकूण १८ कप्प्यापैकी ५ कप्पे माती टाकून बुजविण्यात आले. पूर्वीपासूनच ३ कप्पे बंद असल्याने नदीचे पाणी केवळ १७५ फुटाच्या पात्रातून वाहते. यावरुन पुराची परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे.
इरईच्या खोलीकरणाचे केवळ सोंग केले जात आहे. त्याचा निषेध करुन जलसत्याग्रह तसेच बेशरमाची झाडे लावण्यात येणार आहे.