पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

By admin | Published: May 11, 2014 12:13 AM2014-05-11T00:13:15+5:302014-05-11T00:13:15+5:30

शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून

Irrigation of water supply scheme | पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

Next

शंकरपूर : शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून त्याची अफरातफर केली. त्यामुळे डोमा येथील पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून हे गाव पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोमा येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ही योजना अपयशी ठरल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे दोन वर्षाआधी राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ३६ लाख ४ हजार रुपयाची योजना मंजूर करण्यात आली. या बांधकामासाठी पाणीपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व व्यवहाराचे अधिकार या समितीला देण्यात आले. त्यानुसार शासनाकडून प्रथम हप्त्यापोटी १० लाख २७ हजार रुपयांचा धनादेश पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला. सदर रक्कम खर्च करतेवेळी समितीने ग्रामसभा व मासिक सभेमधून खर्चासंबंधी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु समितीने शासनाचे सर्व नियम डावलून प्रथम हप्ता मनमानीपणे खर्च केला. समितीच्या या मनमानी कारभारामुळे कामाची गुणवत्ता बाधित झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन समितीला हिशेब सादर करण्याची नोटीस देण्यात आली. परंतु तत्कालिन समितीने हिशेब ग्रामसभेमध्ये सादर न केल्यामुळे व अगोदरच समितीच्या आर्थिक व्यवहारावर शंका असल्याने ग्रामसभेत एकमताने अविश्वास पारित करण्यात आला आणि समिती बरखास्त करण्यात आली. त्या ग्रामसभेत नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली असून याची माहितीसुद्धा संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानुसार नवीन समितीच्या नावे दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शासनाकडून १५ फेब्रुवारी २०१३ ला दुसरा धनादेश १० लाख २६ हजार रुपये समितीच्या खात्यात पाठविण्यात आला. परंतु नवीन समितीच्या नावे बँक खाते होण्याच्या आधीच जुन्याच समितीने ही रक्कम बँकेतून काढली. नवीन समिती, स्वच्छता समिती किंवा ग्रामपंचायतीला माहिती न करता हा पैसा खर्च करण्यात आला. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या समितीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवीन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे. या नवीन पाणीपुरवठा समिती व जुन्या पाणीपुरवठा समितीच्या वादात ही योजना अडकली असून डोमावासी योजनेअभावी तहानलेलेच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Irrigation of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.