सीबीएससी बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:30+5:30
विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : देशातील व जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सियस पार झाले. मात्र, सीबीएससी बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपार सत्रात विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. २६ एप्रिल २०२२ पासून परीक्षा सुरू झाल्या. त्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाहीलाही होत असल्याने बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
पंजाबमधील निवडणुकीची परिस्थिती पाहून सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. यामुळे सीबीएससीने निर्णय बदलावा, अशी मागणी पालक करीत आहे.
अनेक वर्गखाेल्यांमध्ये पंख्यांचा अभाव
जिल्ह्यातील काही शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पंख्यांचा अभाव आहे. कूलर किंवा खोली थंड ठेवायची व्यवस्था नसताना उन्हात घामाच्या लाटेत विद्यार्थी एकचित्ताने पेपर सोडवू शकणार नाहीत. उष्णतेमुळे विद्यार्थ्यांचा बळी जाऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापनाने सीबीएससी बोर्डकडे पुढील परीक्षेचे पेपर सकाळ सत्रात घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
भर उन्हात उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवावे लागत आहे. मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या परीक्षा सकाळ सत्रात घ्याव्यात.
- विनायक काळे,
पालक, विसापूर
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान असते. काही वर्गखोल्यांमध्ये कूलर किंवा इतर तत्सम साधनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी एकाग्रतेने परीक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या गुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
- प्राचार्य नरेंद्र बोबडे, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन