हा पर्यायी मार्ग आहे की नरकातून जाणारा मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:08 PM2024-07-01T17:08:30+5:302024-07-01T17:09:10+5:30

नाल्यातून तयार केला पर्यायी मार्ग: अंडरपास पुलाच्या कासवगती कामाने गाव विभागले दोन भागात

Is this the alternative way or the way through hell? | हा पर्यायी मार्ग आहे की नरकातून जाणारा मार्ग?

Is this the alternative way or the way through hell?

सुभाष भटवलकर
लोकमत न्यूज नेटवर्क 
विसापूर :
बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापूर गावात मध्य रेल्वेच्या बल्लारशाह वर्धा प्रस्तावित चौथ्या रेल्वे लाइनच्या विस्तारीकरणामुळे अंडरपास पुलाचे वाढीव बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सदर विसापूर बल्लारपूर रोड हा ४१ क्रमांकाचा एमडीआर बंद आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूरची परवानगी किंवा त्यांना अवगतसुद्धा करण्यात आले नाही आणि पर्यायी मार्ग रेल्वे विभागाने दिला. मात्र, तो मार्ग त्या विभागाचा नसून नाला आहे.


त्यामधून पावसाळ्यात वाहन टाकताना गावकऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत आणि अंडरपास पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने गाव मागील दोन महिन्यांपासून दोन भागात विभागले असून एकमेकांशी संपर्क व इतर गरजेची कामे करण्यासाठी गावकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.


बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे १७ हजार लोकसंख्या असलेले गाव चौथ्या रेल्वे लाइनच्या संथगतीच्या कामामुळे दोन भागात विभागले गेले आहे. एकमेव अंडरपासमधून जाणाऱ्या एमडीआर ४१ क्रमांकाचा मार्गामुळे नागरिकांचे आवागमन होत होते. रेल्वे विभागाने रस्ता बंद करताना संबंधित विभागाची परवानगी न घेता व पर्यायी मार्गाची ठोस तजवीज न करता नाल्यामधून रस्ता काढला. तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा नसून नाला आहे. या नाल्यामधून गावकऱ्यांना जाण्यास मध्य रेल्वेने गावकऱ्यांना भाग पाडले आहे. यामुळे त्यांना भर पावसाळ्यात जणू काही नरक यातना भोगत त्यामधून जावे लागत आहे.


गावाची लोकसंख्या व रेल्वे ट्राफीक बघता अनेक वर्षांपासून येथे पादचारी पुलाची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. परंतु, यावर रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे आणि मागील दोन महिन्यापासून अंडरपास पूल मार्ग चौथ्या रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अस्थायी स्वरुपात बंद केला आहे. कासवगतीच्या कामामुळे तो अनिश्चित काळासाठी बंदच राहणार आहे. यावर लवकर पर्याय काढावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे


रेल्वे विभागाची इतर विभागांसोबत संयुक्त बैठक
झेडआरयुसीसी रेल्वे सदस्य अजय दुबे आणि संदीप पोढे यांनी विसापूरमध्ये अंडरपास रस्ता बंद असल्याची पाहणी करून थर्ड लाइन कॅन्स्ट्रक्शन इंजिनिअर रेल्वे प्रशासन नवीन शर्मा यांना समस्येबाबत अवगत केले. सोबत उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांच्याशी भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. त्यांनी विसापूर ग्रामपंचायत, रेल्वे प्रशासन व थर्ड लाइन कन्स्ट्रक्शन इंजिनिअर अशी संयुक्त बैठक सोमवारी लावून यावर उपाययोजना करू, असे आश्वासन दिले.


"रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर यांच्याशी याबाबत कोणताच पत्र व्यवहार केला नाही. उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी एक महिन्याच्या आत अंडरपास पुलाचे बांधकाम करून स्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यांनी अद्याप सदर रस्ता मोकळा केला नाही व पर्यायी मार्ग दिला. तो रस्ता आमच्या विभागाचा नसून, याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून रस्ता मोकळा करण्यास बाध्य करू."
-वैभव जोशी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर

Web Title: Is this the alternative way or the way through hell?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.