विसापूर येथील सांडपाणी जाण्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:37+5:302021-09-23T04:31:37+5:30
विसापूर : बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील सांडपाणी वाहून जाणारा मार्ग ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी अडवला. यामुळे ...
विसापूर : बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील सांडपाणी वाहून जाणारा मार्ग ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी अडवला. यामुळे येथील पूरबुडी असलेल्या भागात सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी येथील शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यावर तोडगा निघावा म्हणून ग्रामपंचायत तालुका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र प्रशासनाच्या चालढकल धोरणाने ग्रामपंचायतदेखील हतबल झाली. यामुळे विसापूर येथील सांडपाणी जाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विसापूर गावातील वाॅर्ड क्रमांक एक व दोन मधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली बांधकाम केले आहे. मागील ५० ते ६० वर्षांपासून गावातील सांडपाणी वाहून जाण्याचा तोच मार्ग पूर्वीपासून अस्तित्वात आहे. याच मार्गाने पूर्वीचे शेतकरी खंजाजी टोंगे व तदनंतर विनोद सातपुते यांच्या शेतमार्गाने नाल्याला जाऊन मिळत होते. मात्र पूर्वापार वाहून जाणारे सांडपाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर जबरदस्तीने बांध घालून अडविले आहे. परिणामी सांडपाणी नागरिकांच्या घरासमोर जमा होत आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे ऐन पावसाळ्यात आरोग्य धोक्यात आले आहे. शेतातील पिकाचे नुकसान होत आहे, यामुळे सांडपाणी शेतातून जाण्यास शेतकऱ्यांनी मज्जाव केला आहे. मात्र गावातील सांडपाणी पूर्वीपासून त्याच मार्गाने जात होते. आता सांडपाणी जाण्यासाठी नवीन मार्ग कोठून करायचा, हा प्रश्न ग्रामपंचायतपुढे आहे.