अमृतगंगा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगचा मुद्दा पोलीस ठाण्यात
By admin | Published: April 7, 2015 01:10 AM2015-04-07T01:10:48+5:302015-04-07T01:10:48+5:30
येथील हवेली गार्डन चौकातील अमृतगंगा कॉम्प्लेक्समधील पार्किंगचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
चंद्रपूर : येथील हवेली गार्डन चौकातील अमृतगंगा कॉम्प्लेक्समधील पार्किंगचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
पार्किंगच्या जागेवर अगोदर मंदिर व नंतर संबंधित बिल्डरने त्या जागेलाच ताराचे कुंपन घातल्याने चांगलाच वाद निर्माण झाला. पार्किंगच्या जागेवर कंपाऊंड घालण्याला विरोध करणाऱ्या गाळेधारकाला बिल्डरने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. बिल्डरनेही गाळेधारकाविरुद्ध अशाच स्वरूपाची तक्रार केल्याने रामनगर पोलिसांनी बिल्डर व गाळेधारक अशा दोघांविरुद्धही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
शहरातील हवेली गार्डन परिसरात गुंडावार बिल्डर व संजय झाडे व अभय झाडे या बंधूंनी अमृतगंगा नावाने कॉम्प्लेक्स उभारले आहे. या कॉम्प्लेक्सला लागूनच मोकळ्या जागेत आणखी व्यावसायिक गाळे उभारले. यातील एका गाळ्यात श्यामकुमार जेठवाणी यांचे किराणा दुकान आहे. या दुकानाला लागूनच पश्चिमेकडून मोकळी जागा आहे. गाळे खरेदी करताना बिल्डरने सदर मोकळी जागा पार्किंगसाठी देऊ असे आश्वासन श्याम जेठवाणी यांना दिले होते. मात्र काही महिन्यातच बिल्डरने या जागेवर अचानक मंदिराची उभारणी केली. हा धार्मिक मुद्दा असल्याने जेठवाणी यांनी त्याला विरोध केला नाही. शुक्रवारी बिल्डरने त्याच्याही पुढे जाऊन त्या जागेला तारेचे कुंपण घातले. मात्र यावेळी जेठवाणी यांनी कुंपण घालण्याला विरोध केला. त्यातून शाब्दिक चकमक झाली. प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. श्याम जेठवाणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुंडावार बिल्डर्स, अभय झाडे व संजय झाडे यांच्याविरुद्ध ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला, तर झाडे बंधूंच्या तक्रारीवरून श्याम जेठवाणी यांच्याविरुद्धही पोलिसांनी ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला, अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुळात ज्या ठिकाणी गुंडावार बिल्डर्स व झाडे बंधूंनी अमृतगंगा कॉम्प्लेक्सच्या बाजुलाच व्यावसायिक गाळे उभारले, त्याच्या बांधकामाला महानगर पालिकेची परवानगी आहे का, अमृतगंगा कॉम्प्लेक्सच्या आत अगोदरच एक मंदिर बांधले असताना मोकळ्या जागेवर दुसरे मंदिर उभारण्याचे कारण काय, मूळ कागदपत्रात जी जागा गार्डनसाठी दाखविण्यात आली, त्या जागेवर आजपर्यंत गार्डन का तयार करण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणात बांधलेल्या इमारती हटविण्याची घोषणा मध्यंतरी महानगरपालिकेने केली होती. ही घोषणा होताच, अमृतगंगा कॉम्प्लेक्सच्या बिल्डरने एका रात्रीतून मंदिराची उभारणी केली, अशी चर्चाही परिसरात आहे. (प्रतिनिधी)
वादग्रस्त मोकळी जागा आमच्या मालकीची आहे. सदर जागा पार्किंगसाठी देण्यात आली होती, ही बाब अत्यंत चुकीची आहे. मालकीच्या जागेवर बांधकाम करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी मंदिर उभारून त्याला कुंपण घातले. त्यामुळे त्या जागेचा होणारा दुरूपयोग थांबला आहे.
-संजय झाडे, बिल्डर, अमृतगंगा कॉम्प्लेक्स, हवेली गार्डन चंद्रपूर