विद्यार्थीदशेतही ‘तो’ ठरतोेयं युवकांसाठी प्रेरणादायी
By Admin | Published: January 11, 2015 10:48 PM2015-01-11T22:48:50+5:302015-01-11T22:48:50+5:30
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
रत्नाकर चटप - नांदाफाटा
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशीच प्रेरणा बिबी येथील अविनाश पोईनकर (२२) यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना आज मिळत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेला अविनाश डीएडची पदवी घेऊन सध्या चंद्रपूर येथे बी.ए. अंतीम वर्षाचे शिक्षण घेत आहे. वस्तीगृहात राहून आणि खाजगी कार्यालयात काम करुन तो शिक्षण घेत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत आहे. लहानपणापासून कविता लिहण्याचा छंद असलेल्या अविनाशने या क्षेत्रात आज मजल मारली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलन आदी साहित्य संमेलनातून त्याने साहित्यक्षेत्रात आज मोठी उंची गाठली आहे.
त्याचबरोबर जिल्हा व राज्यस्तरावरील विविध कविसंमेलनातून त्याने आपल्या साहित्याची छाप सोडली आहे. याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून बीबी गावात सेवार्थ ग्रुप ही सामाजिक संघटना बांधली. या माध्यमातून ग्रामस्वच्छता राबविणे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्कार देणे, वृक्षारोपण, व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक संस्थांनी पुरस्कारही दिले आहे.
यामध्ये सिंबायसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणेचा ‘महाराष्ट्राचा मराठी वाचक’ पुरस्कार २०१२, तुकोबाराम काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, नवांकुर साहित्य पुरस्कार, विदर्भस्तरीय वक्तृत्व पुरस्कार, वर्धा येथील आदर्श विद्यार्थी पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. साहित्याच्या सोबत अविनाशने वक्तृत्व, वादविवाद, संचालन आदी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे प्राप्त केली आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अनेक वृत्तपत्र, नियतकालिके, दिवाळी अंकातून त्याच्या कविता आणि साहित्य प्रकाशित झाले असून आजही हे कार्य सुरुच आहे. गावरानातील कविता, काव्यपुष्प, अक्षरवैदर्भी, सत्याग्रही विचारधारा, अंकुर, अक्षरवेल आदी काव्यसंग्रह व मासिकातून कवितेचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे आज कोरपना तालुक्यातील अनेक युवकांना प्रेरणा देऊन वाचन व लिखाण संस्कृतीला समृद्ध करण्याचे धडे देण्याचे कार्य अविनाश करीत आहे.