नातेवाईकांचे अंतिम दर्शन घेणेही सामान्यांना कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:50+5:30
कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटानंतर आता स्पेशल दर्जा काढून नियमित ट्रेन सुरू झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने अनेकांना अडचणीचे होत आहे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यदर्शनासाठी जाणेही सद्य:स्थितीत कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार करून जनरल तिकीट सुरू करावे, तसेच एसटी संपावरही तोडगा काढण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे.
विशेष ट्रेन आता सर्वसाधारण झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने सामान्यांचा प्रवासही कठीण झाला आहे. त्यातच अडचणीच्या वेळी किंवा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रवास कसा करायचा, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
हिंमत करणे पडणार महागात
रेल्वेचे जनरल तिकीट देणे बंद आहे. असे असतानाच काही जण अत्यावश्यक ठिकाणी जायचे असल्यास मोठी हिंमत करून आरक्षण डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना दंड भरावा लागत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
खासगी वाहन परवडेना
कुटुंबातील नातेवाइकांचा अचानक मृत्यू झाल्यास सामान्य नागरिकांना जाण्याचा मोठा प्रश्न पडतो. हक्काची एसटी बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी आधीच आरक्षण करावे लागते. खासगी वाहन करावे तर खिशात पैसा नाही, अशावेळी काय करावे, हा प्रश्न त्यांना पडत आहे.
सामान्यांची कुचंबणा का?
केंद्र सरकारने अंत्योदय योजनेतील गरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी योजनेत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारलाही भारतात गरीब नागरिक राहतात, हे ठाऊक आहे तर त्यांच्यासाठी असलेली पॅसेंजर, रेल्वेतील जनरल तिकीट बंद करून कुचंबणा का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.