मायबोलीची अभिरुची वाढविणे अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:45+5:302021-03-05T04:27:45+5:30
मोहन कापगते : ब्रह्मपुरी येथे मराठी राजभाषा दिन ब्रह्मपुरी : आज जगामध्ये सहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यापैकी दर ...
मोहन कापगते : ब्रह्मपुरी येथे मराठी राजभाषा दिन
ब्रह्मपुरी :
आज जगामध्ये सहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यापैकी दर १५ दिवसांनी एक भाषा नामशेष होत असून आपली मायबोली जगली पाहिजे त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या माय मराठीची अभिरुची वाढविणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ मोहन कापगते यांनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित कवी कुसुमाग्रज जयंती दिवस ‘मराठी राजभाषा दिन ’ कार्यक्रमात बोलत होते.
प्राचार्य, डॉ. एन. एस कोकेडे, उपप्राचार्य डाॅ. डी. एच. गहाणे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पडला. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख कवी डॉ. धनराज खानोरकर होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. युवराज मेश्राम, डॉ. प्रकाश वट्टी, डॉ. पद्माकर वानखडे उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ मेश्राम म्हणाले की आपण व्यक्त होतो तो मातृभाषेत, त्यामुळे मराठीतच बोला. बहुभाषिक व्हा, पण मायबोलीला विसरु नका, अध्यक्षीय भाषणातून कवी खानोरकरांनी मराठीतील अति महत्त्वाच्या साहित्यसंपदावर प्रकाश टाकून मराठीच्या संवर्धनावर भाष्य केले. या प्रसंगी मनीष डोर्लीकर यांनी आपली सुंदर कविता सादर केली.
प्रास्ताविक,संचालन डॉ. पद्माकर वानखडे तर आभार डॉ. प्रकाश वट्टी यांनी मानले.