कापसामुळे शेतकऱ्यांना सुटताहे खाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:22 PM2018-02-23T23:22:25+5:302018-02-23T23:22:25+5:30
कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे.
आॅनलाईन लोकमत
गोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. बोंडअळीने कापूस पुर्णत: खराब झाला असून कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे कापसाला हात लावल्यास मोठ्या प्रमाणात खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
यावर्षी बोंडअळीने कापसाला खाऊन टाकल्यानंतर कापसावर किड्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कापूस घरीच असल्याने आता कापसाला हात लावल्यास खाज सुटत आहे. याचा विपरित परिणाम शेतकºयांच्या शरिरावर व्हायला लागला आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतला आहे. गोवरी, पोवनी, चिंचोली व बहुतांश परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी हीच परिस्थिती उद्भवली असून शेतकºयांना कापसाच्या खाजेने बेजार केले आहे.
ज्यांच्या घरी कापूस, त्यांनाच होतेय अॅलर्जी
कापूस ज्या शेतकऱ्यांच्या घरी भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने काही शेतकºयांच्या घरी भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. अनेक शेतकऱ्यांनी राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू केला आहे.
भीतीपोटी कवडीमोल भावात विक्री
कापसामुळे मोठ्या प्रमाणात खाज सुटत असल्याने शेतकऱ्यांनी त्वचेच्या आजाराच्या भीतीपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करायला सुरूवात केली आहे. कोणत्याही आजाराला बळी पडण्यापेक्षा कापूस विकलेला बरा, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कापसाला दर नसल्याने कापूस घरीच भरून ठेवला होता. मात्र कापसाला मोठ्या प्रमाणात खाज असल्याने शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. नाईलाजाने कापूस विकावा लागला.
- सुधाकर जुनघरी,
शेतकरी, गोवरी.