इटियाडोह धरणाच्या पाण्यापासून अनेक गावे वंचित
By admin | Published: November 29, 2014 11:18 PM2014-11-29T23:18:51+5:302014-11-29T23:18:51+5:30
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री
चंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
इटियाडोह धरणाची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाली. पाणी पुरवठ्याची सुरूवात सन १९७२ ला करण्यात आली. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौरस मिटर असून पाण्याची क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाचे पाणी अर्जूनी (मोर) ते आरमोरी (गडचिरोली) असा ८० ते ९० किलोमिटरचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. परंतु अर्जुनी (मोर) पासून ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या बोंडगाव(देवी) परिसरातील २५ ते ३० खेडेगाव या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत.
या परिसरातील जनतेला प्राण्यांना, पशुपक्षांना, उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई भासत असते. या परिसरातील पाणी टंचाईचा विचार करून शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या प्रमुख पुढाकाराने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन देवून समस्यांची जाणिव करून देण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय बुटले, जिल्हा संघटक अनिल डोंगरे, शहर उपाध्यक्ष संजय मुरस्कर, शहर संघटक कमलेश रामटेके, अरुण कांबळे, दीपक तांड्रा (घुग्घुस) आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)