सहा वर्षे झाले; पोंभूर्णा बस स्थानक केव्हा पूर्ण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:26 PM2024-09-09T13:26:54+5:302024-09-09T13:27:46+5:30

Chandrapur : सहा वर्षांत चार ठेकेदार बदलले अन् काम रखडले

It's been six years; When will Pomburna bus station be completed? | सहा वर्षे झाले; पोंभूर्णा बस स्थानक केव्हा पूर्ण होणार?

It's been six years; When will Pomburna bus station be completed?

लोकमत न्यूज नेटवर्क 
पोंभूर्णा :
पोंभूर्णा येथे सुसज्ज व अद्ययावत बस स्थानकाचे सहा वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले. काही प्रमाणात बांधकाम झाले. सांगाडा उभारण्यात आला; मात्र त्यापुढे बस स्थानकाचे काम काही पुढे गेले नाही. ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या अद्ययावत पोंभूर्णा बस स्थानक बंद अस्वस्थेत असून, आतापर्यंत चार बांधकाम करणारे कंत्राटदार काम सोडून निघून गेले. त्यामुळे हायटेक बस स्थानक केवळ ड्रॉइंग शिटवरच काढलेले आहे. यामुळेच प्रवाशांना जुन्या बस स्टैंड चौकात उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे.


सहा वर्षांपासून रखडलेल्या या बस स्थानकाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, याकडे तालुकावासीयांचे आता लक्ष लागले आहे. ७ करोडो ५० लक्ष रुपये खर्च करून सुख-सुविधायुक्त अशा हायटेक बस स्थानकाचे भूमिपूजन २१ डिसेंबर २०१८ ला करण्यात आले. ज्या ज्या ठेकेदारांना बांधकामाचे कंत्राट मिळाले, ते सर्व ठेकेदार दोन-तीन महिन्यांचे काम करून रफूचक्कर होत गेले. आतापर्यंत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी चार ठेकेदार बदलले. पण, काम मात्र अपूर्णच आहे. बांधकामही बंद पडले आहे. बस स्थानक उभे केले जात असताना, याकडे खुद्द एसटी महामंडळाचेच डोळेझाक झाले असल्याने बांधकामाचा पूर्णतः बट्ट्याबोळ उडाला आहे. प्रवाशांना उत्तम सोयी सुविधायुक्त अशा अत्याधुनिक बस स्थानकाचा फक्त सांगाडा उभा आहे. अर्धवट झालेल्या बांधकामावर झाडे झुडुपे उगवली असून, बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी साहित्यास जंग लागले आहे. ते वापरण्यायोग्य नसल्याचे बोलले जात आहे. याकडे गंभीरतेने बघणे गरजेचे झाले आहे. 


जुने बस स्थानकही तोडले 
तालुका निर्मितीला तब्बल २५ वर्षे झाले असले, तरी पोंभूर्य्यात अद्यापही नवीन बस स्थानक बांधण्यात आले नाही. उलट सात वर्षांअगोदर राज्य महामार्गाच्या नावावर शहरातील जुने बस स्टॉप तोडून टाकण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना उन्हात बसून एसटीची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: It's been six years; When will Pomburna bus station be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.