जय जय श्रीरामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:10 PM2018-03-25T23:10:01+5:302018-03-25T23:10:01+5:30
पताके, तोरण व रोषणाईने सजलेले शहरातील प्रमुख रस्ते, त्यावर बॅन्ड पथकाचा ताल, रामाचा गजर करणारी गिते आणि जय श्री रामच्या जयघोषाने रविवारी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : पताके, तोरण व रोषणाईने सजलेले शहरातील प्रमुख रस्ते, त्यावर बॅन्ड पथकाचा ताल, रामाचा गजर करणारी गिते आणि जय श्री रामच्या जयघोषाने रविवारी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली. सायंकाळी गांधी चौकातून निघालेल्या या शोभायात्रेतील विविध देखावे पाहण्यासाठी चंद्रपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा अलोट गर्दी केली होती.
राम जन्मोत्सव समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या उत्साहामुळे शनिवारपासूनच उत्सवाला रंग चढला होता. शनिवारी रात्रीच शहरातील प्रमुख रस्ते तोरण, पताका, स्वागतद्वार व रोषणाईने सजले होते. शहरातील विविध चौक भगव्या तोरणाने नटले होते. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकावर रामनामाचा जप करणारी गिते लावण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजतानंतर शहरातील वातावरण अधिक भक्तीमय झाले. दरम्यान, सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास येथील काळाराम मंदिरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. रामभक्तांचे लोंढेच्या लोंढे गांधी चौकाकडे शोभायात्रा पाहण्यासाठी जात होते. सायंकाळी ७ वाजता शोभायात्रेला गांधी चौकातून प्रारंभ झाला. यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. बँडपथकावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला होता.
या शोभायात्रेत भजन मंडळेही सहभागी झाले होते. यात महिला भजन मंडळाचाही समावेश होता. भाजपा, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. रात्री ८ वाजताच्या सुमारास महात्मा गांधी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
स्वयंसेवकांचा अभाव
शोभायात्रेच्या मार्गात विविध ठिकाणी महाप्रसाद आणि पाणी पाऊचचे स्टॉल लागले होते. पाऊच आणि कागदी प्लेटामधून पदार्थ खाल्यावर ते रस्त्यावर फेकले जात होते. यापूर्वी चंद्रपुरात गणेश विसर्जन असो की अन्य कुठलीही शोभायात्रा महाप्रसादादरम्यान होणारा कचरा स्वयंसेवकांमार्फत तत्काळ उचलला जात होता. मात्र यावेळी स्वयंसेवकांचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी रस्त्यावर कागदी प्लेटा पडलेल्या दिसून येत होत्या. काही संघटनांनी महाप्रसादाजवळच डस्टबीनची व्यवस्था केली होती.
विविध ठिकाणी महाप्रसाद वितरित
स्थानिक गांधी चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ठिकठिकाणी खाद्य पदार्थ, पिण्याची पाणी, फळे, सरबत व महाप्रसाद वाटपाचे स्टॉल लावले होते. शोभायात्रा पाहण्यासाठी आलेले भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत होते.
पालकमंत्र्यांनी केले शोभायात्रेचे स्वागत
राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवारी चंद्रपुरात होते. रामनवमीनिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी शोभायात्रेत पायदळ फिरून देखावे बघितले व शोभायात्रेचे स्वागत केले.