अंगणवाडी महिलांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:56 PM2019-02-11T22:56:17+5:302019-02-11T22:56:37+5:30
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सीटूच्या नेतृत्वात सोमवारी मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जेलभरो आंदोलन करीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सीटूच्या नेतृत्वात सोमवारी मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जेलभरो आंदोलन करीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
जनतेची फसवेगीरी करुन शासन चालवायचे हा मोदी सरकारचा एक कलमी कार्यक्रम अांहे. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करु, दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना दीडपट भाव देऊ, अशा फसव्या घोषणा करुन नरेंद्र मोदी सत्तेत आले. पंतप्रधान झाल्यानंतर ही सुधारणा न करता जुनीच चाल पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळत आहे. अंगणवाडी महिलांच्या मानधनात १५०० रुपये वाढ करण्याची घोषणा ११ सप्टेंबर २०१८ ला करण्यात आली आणि ही वाढ दिवाळीपूर्वी मिळेल, असे ठासून सांगितले होते. दिवाळी आली आणि गेली. वाढ मात्र मिळाली नाही. घोषित केलेली वाढ तात्काळ मिळावी, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जेलभरो कार्यक्रम करण्यात आला. अंगणवाडी महिलांचा मोर्चा गांधी चौकातून काढण्यात आला. फसव्या घोषणा देणे बंद करा, नरेंद्र मोदी होश मे आओ, मानधन वाढ झालीच पाहिजे, अशा गगणभेदी घोषणा देण्यात आल्या. मोर्चाच्या प्रारंभी माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनीदेखील मोदी शासनावर कडाडून हल्ला केला. तसेच अंगणवाडी महिलांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या यथाशिघ्र सोडवाव्या, अशी मागणी दीपक जयस्वाल यांनी केली. मोर्चा जि.प. समोर पोहचल्यावर सेविकांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करीत जेलभरो आंदोलन केले, अशी माहिती विजय चौधरी यांनी दिली. मोर्चात रमेशचंद्र दडीवडे, प्रमोद गोडघाटे, शोभा बोगावार, सुरेखा तितरे, शारदा लेनगुरे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या.