चिमूर तालुक्यातील शिवारात होणार ‘जलक्रांती’
By admin | Published: April 19, 2017 12:47 AM2017-04-19T00:47:00+5:302017-04-19T00:47:00+5:30
ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली.
जलयुक्त शिवाराची ७४५ कामे पूर्ण : आढावा बैठक
चिमूर : ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या जलयुक्त शिवारातील मसगी मामा तलाव इत्यादी कामातून चिमूर तालुक्यातील शिवारात जलक्रांती होणार आहे.
चिमूर तालुक्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तालुक्यात असलेल्या मसगी नाला खोलीकरण, बंधारे, मामा तलाव दुरुस्ती, पंचायत समितीतंर्गत शेततळे या कामाचा जलयुक्त शिवारात समावेश आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवारावर करण्यात येणारा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत जलयुक्त शिवाराच्या कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवले जात आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील समाविष्ठ चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाची आढावा बैठक नुकतीच चिमूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा सभेत चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, चिमूरचे तहसीलदार संतोष महले, नागभीडचे तहसीलदार समीर माने, संवर्ग विकास अधिकारी एम.बी. डोंगरे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, कृषी अधिकारी एम.पी. पवार, यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ या सत्रात २२ गावाचा समावेश करण्यात आला होता. त्यास १४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१६-१७ या वर्षात २७ गावांसाठी सहा कोटी ८८ लाख तर २०१७-१८ या वर्षामध्ये २४ गावांचा समावेश करण्यात आला. या कामासाठी आतापर्यंत २१ कोटी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये ९४५ कामे प्रस्तावित होती .आतापर्यंत ७८५ कामे पूर्ण करण्यात आली. तर ८१९ कामे प्रगती पथावर आहेत. या कामामध्ये कृषी विभागातर्फे ७२७ कामे पंचायत समिती मनरेगा १६ कामे, जि.प. सिंचाई विभागातर्फे १४ कामे जलसंधारण लघू सिंचन २३ कामे व वनविभागातील २६६ कामे आहेत.
आढावा सभेतून जलयुक्त शिवाराच्या कामाला गती देवून काम योग्य पद्धतीने वेळेवर पूर्ण करण्याच्या सुचना देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सुचना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चिमूर तालुक्यात होणाऱ्या या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे गावागावातील शिवारात जलक्रांती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)