राजुऱ्याच्या सालासार जिनिंगला आग
By admin | Published: March 6, 2017 12:28 AM2017-03-06T00:28:18+5:302017-03-06T00:28:18+5:30
राजुरा येथील सालासार जिनिंग अचानक आग लागल्यामुळे ४०० क्विंटल कापूस जळून खाक झाला.
२० लाखाचे नुकसान: ४०० क्विंटल कापूस खाक
राजुरा : राजुरा येथील सालासार जिनिंग अचानक आग लागल्यामुळे ४०० क्विंटल कापूस जळून खाक झाला. या घटनेत २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
राजुरा येथील सालासार जिनिंगचे संचालक पाडुरंग चिल्लावार, गोपाल झंवर, रमेश झंवर, राजेंद्र झंवर असून या जिनिंगमध्ये पाच हजार क्विंटल कापूस होता. आज सकाळी १० वाजता ट्रकमध्ये ( क्रमांक एमएच- ३४, एम- २०४७ ) कापूस होता. ट्रक जिनिंगच्या परिसरात पोहचताच आग लागली. ट्रकमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी २००८, २०११ आणि २०१७ मध्ये आग लागली. या जिनिंगमध्ये वारंवार आग लागल्याचे गुढ अद्यापही कायम आहे. राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस येत असून जिनिंगला आग लागल्याने संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलल्या जात आहे. राजुरा तालुक्यात दोन जिनिंग असून या दोन्ही ठिकाणी बाहेर राज्यातील कामगार काम करतात. स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कामावर घेतले जाते.
राजुरा येथील सालासार जिनिंगमध्ये करोडोचा कापूस होता. राजुरा नगर परिषद आणि बल्लारपूर नगर परिषदेचे फायर ब्रिगेड वेळेवर पोहचल्यामुळे मोठी हानी टळली आहे. वारंवार याच जिनिंगमध्ये आग लागते हे विशेष. (शहर प्रतिनिधी)