साडेचार हजार किमी अंतर पार करून जनजागृती यात्रा स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:41 PM2019-05-21T22:41:51+5:302019-05-21T22:42:19+5:30

महाराष्ट्रातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इको-प्रोच्या वतीने १ मे रोजी परिक्रमेला सुरुवात झाली. ही परिक्रमा २० दिवसांचा अखंड प्रवास करून स्वगृही दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान इको-प्रोचे सदस्यांनी तब्बल साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करीत ३० जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश दिला.

Janjagruti Yatra by crossing 4.5kms / km | साडेचार हजार किमी अंतर पार करून जनजागृती यात्रा स्वगृही

साडेचार हजार किमी अंतर पार करून जनजागृती यात्रा स्वगृही

Next
ठळक मुद्दे३० जिल्ह्यात दिला संदेश : इको-प्रो ची महाराष्ट्र वारसा संवर्धन परिक्रमा पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इको-प्रोच्या वतीने १ मे रोजी परिक्रमेला सुरुवात झाली. ही परिक्रमा २० दिवसांचा अखंड प्रवास करून स्वगृही दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान इको-प्रोचे सदस्यांनी तब्बल साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करीत ३० जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश दिला.
ही परिक्रमा १ मे रोजी चंद्रपूर येथील पठाणपुरा गेट येथून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रारंभ झाली. या मार्गात मूल, गडचिरोली येथून आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे ही परिक्रमा पोहोचली. वैरागड ग्रामपंचायत आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने येथे स्वागत करण्यात आले. प्राचीन वैरागड किल्ल्याला भेट देण्यात आली. त्यानंतर ही परिक्रमा गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि हिरव्यागार वनराईतून मार्गक्रमण करत नवेगाव बांधच्या दिशेने रवाना झाली. येथे सायंकाळी वन अधिकारी व कर्मचारी आणि गावकरी यांच्याशी संवाद साधण्यात आला. जंगलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न यावेळी समजून घेण्यात आले. दुसºया दिवशी पवनी येथील ऐतिहासिक किल्ला, उमरेड येथील गोंडकालीन भिंतीची पाहणी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी गोंडकालीन वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी इको प्रोच्या मार्गदर्शनात काम करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागपूर येथे वनराई च्या वतीने स्वागत आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपुर येथे ‘भारत वन’ संरक्षण साठी सुरु असलेल्या लढा देणारे व्यक्ती आणि भारतवनला भेट देऊन समर्थन देण्यात आले. यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा येथे परिक्रमा पोहोचली. जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे नैसर्गिक वारसा सोबतच ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे. सध्या त्याकडे दुर्लक्ष होत असून, जतनासाठी उपाय योजना आखण्याची गरज असून स्थानिक युवक सुद्धा येथे सहकार्य करीत असल्याचे चांगले चित्र दिसून आले.
पुढे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर चाळीसगावच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांनी सांगितले की पारोळा येथे भुइकोट किल्ला आहे. ते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे गाव आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर सदर किल्ला उपेक्षित असल्याचे दिसले. त्यानंतर येथे जनजागृती करण्यात आली. येथील युवकांनी बैठक घेत इको आर्मी नावाचा ग्रुप तयार करून किल्ला स्वच्छतेची शपथ घेतली.
येथून पुढे नाशिक, ठाणे, मुंबई येथे दाखल झाल्यानंतर समुद्री मार्गाने कोकणात प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समुद्र किल्ल्याची पाहणी करण्यात आली. मुरुड जंजिरा, पन्हाळा किल्ला, सिंधुदुर्ग, जयगड किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर पुणे, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा येथे परिक्रमा पोहचली. बापू कुटीला भेट दिल्यानंतर या परिक्रमेचा समारोप कार्यक्रम करून परिक्रमा चंद्रपूरला स्वगृही परतली.
परिक्रमेतील सहभागी सदस्य
या परिक्रमित २० वर्ष वयापासून तर ६५ वर्ष वयापर्यंत २५ सदस्य सहभागी झाले होते. यात बंडू धोतरे, नितीन बुरडकर, रवींद्र गुरुनले, संजय सब्बनवार, अनिल अड्डूरवार, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजू काहीलकर, सचिन धोत्रे, कपिल चौधरी, आकाश घोडमारे, जितेंद्र वाल्के, संदीप जीवने, मनीष गावंडे, संदीप जेऊरकर, सुनील मिलाल, नितीन रामटेके, ललित मुल्लेवार, राजेश व्यास, चित्राक्ष धोतरे आदींचा सहभाग होता.
अहवाल सादर करणार
या परिक्रमेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हानिहाय नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा संवर्धन, पुढील असलेली आव्हाने, याकडे लक्ष वेधण्याकरिता उचित उपाययोजना व्हावी, याकरिता त्या त्या जिल्ह्यातील अभ्यासक यांच्याकडून माहिती मिळवून आणि प्रत्यक्ष भेटीतील अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Janjagruti Yatra by crossing 4.5kms / km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.