जटपुरा गेट ते रेल्वे पूल दरवाढ @ ३४०० रुपये
By admin | Published: April 24, 2017 01:00 AM2017-04-24T01:00:48+5:302017-04-24T01:00:48+5:30
शासनाने नवीन आर्थिक वर्षांत चंद्रपूर शहरातील विविध भागातील भूखंडांचे वार्षिक बाजारमूल्य घोषित केले आहे.
भाव कडाडले : चंद्रपुरात भूखंडांच्या बाजारमूल्यात सरासरी चार टक्के वाढ
चंद्रपूर : शासनाने नवीन आर्थिक वर्षांत चंद्रपूर शहरातील विविध भागातील भूखंडांचे वार्षिक बाजारमूल्य घोषित केले आहे. त्यामध्ये भूखंडांची सरासरी चार टक्के वाढ करण्यात आली आहे. जटपुरा गेट ते रेल्वे पूल मार्गाच्या आतील भागातील भूखंडाची शहरात सर्वाधिक दरवाढ ३ हजार ४०० रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आली आहे. या शासकीय दरवाढीपेक्षा खुल्या बाजारातील भाव अधिक आहेत.
शासनाकडून दरवर्षी बार्षिक बाजारमूल्य दर तक्ता जाहीर करण्यात येत असतो. भूखंडांची होणारी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून ही दरवाढ ठरविली जाते. १ एप्रिलपासून नवीन भूखंड दरवाढ लागू करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते महात्मा गांधी मार्ग हा बाजार मूल्यामध्ये सर्वाधिक महागडा ठरला आहे. जुना दर ५५ हजार ९०० चौरस मीटर होता. तो आता ५७ हजार २० रुपये झाला आहे. हा खुल्या बाजारातील दर त्यापेक्षाही अधिक आहे. परंतु नवीन वार्षिक बाजार मूल्यामध्ये जटपुरा गेट ते रेल्वे पूल रस्त्याच्या आतील भूखंडांनी भाव खाल्ला आहे. या मुख्य रस्त्यालगतच्या भूखंडांचा जुना दर प्रती चौरस मीटर ४६ हजार रुपये होता. तो आता ४६ हजार ९२० रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आला आहे. याच मार्गावरील आतील भूखंड यापूर्वी १३ हजार ९०० रुपये चौरस मीटर दराने शासकीय शुल्क आकारणी केली जात होती. आता तो दर १७ हजार ३०० चौरस मीटर झाला आहे. त्यानुसार, ३ हजार ४०० रुपये म्हणजे तब्बल २४ टक्के दरवाढ झाली आहे.
शहराचा विस्तार वरोरा, बल्लारपूर-मूल मार्गावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन भूखंड याच मार्गावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्या भागात मागणी अधिक आहे. वरोरा मार्गावर मुख्य रस्त्यावरील एका भागात जुना दर २७ हजार ७२० रुपये चौरस मीटर होता. तो आता २८ हजार २७० चौरस मीटर करण्यात आला आहे. दुसऱ्या भागात जुना दर २४ हजार ४०० रुपये होता. तो आता २७ हजार ७०० रुपये करण्यात आला आहे. त्यानुसार, ही दरवाढ १३.५ टक्के झाली आहे. मूल-बल्लारपूर बायपास रस्त्यावरील भूखंडाचा जुना दर १२ हजार १४० रुपये होता. तर नवीन दर १३ हजार ४०० रुपये झाला आहे. तसेच याच मार्गावर आतमधील भूखंडाचा जुना दर १० हजार ५०० रुपये होता. तो आता १० हजार ७१० रुपये झाला आहे. (प्रतिनिधी)
दाताळामध्ये शेतीचा भाव हेक्टरी १४ लाख ७ हजार रुपये
शहरालगत असलेल्या आणि मनपा क्षेत्रात येणाऱ्या दाताळा येथे शेत जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्यात हेक्टरी २८ हजार १५० रुपये दरवाढ करण्यात आली आहे. जुना दर १४ लाख ७ हजार ६०० रुपये होता. तो आता १४ लाख ३५ हजार ७५० रुपये करण्यात आला आहे. चंद्रपूर तालुक्यात जिरायती शेतीचा हेक्टरी ४ लाख ६२ हजार रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. एनए जमीन, हाय-वे आणि गावठाण भूखंडात किंचित दरवाढ करण्यात आली आहे. एनए जमिनीचे दर ७९० रुपयावरून ८३० रुपये झाले आहेत. हाय-वेवरील भूखंड ८७०-९९० रुपयांवरून ९१०-१०४० रुपये आणि गावठाण जमीन ९१०-१०४० रुपयांवरून ९६०-१०९० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
महागड्या भूखंडांचे क्षेत्र
कस्तुरबा रस्त्यावरील भूखंडाचा ५१ हजार रुपये चौरस मीटर दर आहे. विनबा रस्ता ३५ हजार ९० रुपये, जटपुरा गेट ते महात्मा गांधी चौक ५७ हजार २० रुपये, महात्मा गांधी रस्ता ४४ हजार ३४० रुपये, वरोरा रस्ता वडगाव १२ हजार रुपये याप्रमाणे नवीन चौरस मीटरचे दर आहेत.
नोंदणी शुल्काला ३० हजारांची मर्यादा
भूखंडांची रजिस्ट्री करताना महत्तम मर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये महत्तम ३० हजार रुपये नोंदणी फी भरावी लागेल. भूखंड अधिक किंमतीचा असून त्यानुसार नोंदणी फी ३० हजार रुपयांपेक्षा अधिक असली तरीही त्या खरेदीदाराला ३० हजार रुपयेच भरावे लागतील. परंतु मुद्रांक शुल्कासाठी कोणतीही मर्यादा नाही. भूखंडाचे वार्षिक दरानुसार मूल्यांकन होईल. त्यानंतर आलेल्या मूल्यावर मनपा क्षेत्रात ६ टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागेल. ते नगर परिषद क्षेत्रात ५ टक्के आणि ग्रामीण क्षेत्रात ४ टक्के दराने भरावे लागेल. त्यामध्ये आणखी १ टक्का दराने नोंदणी शुल्क लागेल.