जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांवर; सोन्याचा भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:51+5:30
सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी, सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे अनेकांनी खरेदी केली. दसऱ्याला सोने खरेदीची परंपरा असली तर दर वाढल्याने ग्राहक फिरकतील काय, याची चिंता सराफांना आहे. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर ४९ हजारांवर पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देण्याची परंपरा आहे. जावईबापूंचा यंदा पहिलाच दसरा असेल तर काही कुटुंबांत सासरकडून सोन्याचे पान दिले जाते. मात्र, यंदा सोन्याचे दर प्रति तोळा ४९ हजारांवर पोहोचल्याने खरेदी करताना विचारच करावा लागणार, अशी सराफा बाजारातील स्थिती आहे.
दिवाळी तोंडावर असल्याने चंद्रपुरातील सराफा बाजारात ग्राहकांची थोडी गर्दी दिसू लागली आहे. सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी, सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे अनेकांनी खरेदी केली. दसऱ्याला सोने खरेदीची परंपरा असली तर दर वाढल्याने ग्राहक फिरकतील काय, याची चिंता सराफांना आहे. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर ४९ हजारांवर पोहोचले.
चांदीच्या दरातही वाढ
चंद्रपुरातील सराफा बाजारात मुंबई, सोलापूर, कोल्हापूर व नागपूरातून दागिने येतात. चांदीच्या दरात मागील आठवड्यात स्थिरता होती. दिवाळीच्या तोंडावर त्यामध्ये प्रति तोळा ३०० रूपयांची वाढ झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली. याचा परिणाम जिल्ह्यातील सराफा बाजारावर झाला आहे. दिवाळीत हा दर पुन्हा वाढू शकतो.
अशी ओळखा सोन्याची शुद्धता
२४ कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध आहे. मात्र, पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. साधारणत: २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी होतो. त्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते, असा दावा एका व्यावसायिकाने केला. २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल, तर त्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले जातात. केंद्र सरकारने दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क तयार केले. हॉलमार्क दागिन्यांवर असतात. काही जाचक अटींमुळे व्यावसायिकांनी सरकारविरुद्ध बंद पाळला होता.
चंद्रपुरातील बाजारपेठेवर कोरोनाचे सावट
सोन्याच्या दरात वाढ का झाली, याबाबत चंद्रपुरातील सराफा व्यावसायिक नथमल टिबडेवाल यांना विचारले असता म्हणाले, सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची विविध कारणे आहेत जागतिक बाजारातील चलन किमतीत झालेला बदल, महागाई, रिझर्व्ह बँकेमध्ये साठविलेले सोने, व्याजदर, दागिने बाजार, भौगोलिक तणाव, व्यापार युद्ध व इतर अनेक घटकांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होतो. कोरोनामुळे चंद्रपुरातील बाजारावरही मोठा फटका बसला आहे.
सराफा व्यवसाय रुळावर येण्याची चिन्हे
कोरोनामुळे इतरांप्रमाणे सराफा व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. कोरोना संसर्ग धोकादायक स्थितीत असताना जीव वाचविण्यालाच प्राधान्य देणे सुरू होते. जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळल्यास बाजारपेठ ठप्प होती. आता स्थिती बदलू लागली. दसरा व दिवाळीसाठी सराफा व्यावसायिकांनी नवीन माल खरेदी करून दुकाने सजविली आहेत. बाजारात थोडी गर्दी दिसत असून अशीच स्थिती राहिल्यास खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.