जेसीबीने दूरध्वनीचे केबल तोडले
By Admin | Published: March 3, 2017 12:57 AM2017-03-03T00:57:27+5:302017-03-03T00:57:27+5:30
शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने
इंटरनेट सुविधा बंद : सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम
मूल: शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने दूरध्वनी सेवेचे अनेक केबल जेसीबीने तोडले जात आहेत. त्यामुळे इटनेटच्या सेवेचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात बीएसएनएलचे अधिकारीही सेवा देण्यासाठी तत्परता दाखवित नसल्याने ग्राहक त्रस्त झाल्याचे चित्र मूल शहरात दिसत आहे.
शहरात सुरु असलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते व नाल्या तयार करताना जेसीबीने खड्डा करायचा असल्यास बीएसएनएल विभागाला कळविणे आवश्यक आहे. मात्र तसे न केल्याने केबल तोडल्या गेले. वन विभाग कार्यालयापासून गेलेले बीएसएनएलचे केबल तब्बल तीनदा तोडण्यात आले. यावेळी रविवार या सुट्टीच्या दिवशी जेसीबीने नाली खोदण्यात आली. त्यामुळे केबल तोडण्यात आले. शासकीय कार्यालय सुरु असताना कंत्राटदाराने कामे करायला पाहिजे किंवा त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन ते चार दिवसांपासून इंटरनेट सुविधांचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यानंतरही मात्र बिल तेवढेच भरावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी असंतोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)