टॉवर उभारणीसाठी उभ्या पिकातून नेला जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:29 PM2018-11-22T22:29:10+5:302018-11-22T22:29:56+5:30
शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे सुटता सुटत नाही. अशातच कोरपना तालुक्यातील कारवाई गावाच्या शिवारात खासगी वीज कंपनीच्या टॉवरचे काम संबंधित कंत्राटदार बळजबरीने करीत असल्याची धक्कादायक माहिती लखमापूर येथील सखाराम बावणे या शेतकऱ्याने गुरुवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे सुटता सुटत नाही. अशातच कोरपना तालुक्यातील कारवाई गावाच्या शिवारात खासगी वीज कंपनीच्या टॉवरचे काम संबंधित कंत्राटदार बळजबरीने करीत असल्याची धक्कादायक माहिती लखमापूर येथील सखाराम बावणे या शेतकऱ्याने गुरुवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हे काम करण्यासाठी आपली अनुमती नसतानाही वॉरोरा करनूल ट्रान्सनिशन लिमिटेड कंपनीने उभ्या कापूस पिकातून खोदकामासाठी जेसीबी चालविला. टॉवर उभारणीच्या कामाला विरोध केला तर आशिष गुप्ता नावाचा कंत्राटदार पोलिसांच्या नावाने फोन करून धमक्या देतो. इतकेच नव्हे, तर रात्री शेतात टॉवरचे काम करतो, असा गंभीर आरोपही सखाराम बावणे या शेतकऱ्याने यावेळी केला.
याबाबत एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सुणावणीसाठी बोलाविले होते. तेव्हा त्यांना योग्य मोबदला द्या, नाही तर टॉवरचे बांधकाम करायला आपला विरोध असल्याचे सांगितले. मात्र यानंतर कोणताही पत्रव्यवहार प्रशासनाकडून झाला नाही. शेतात बळजबरीने टॉवरचे काम सुरू आहे. मात्र आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही, अशी व्यथाही सदर शेतकºयाने मांडली.
हा प्रकार गावातील १२ शेतकऱ्यांसोबत सुरू आहे. यामध्ये प्रदीप दादाजी भोयर, संदीप श्यामराव लोहे, सूर्यभान विठोबा लोहे, नत्थू भिवा आत्राम व शालिक बापूराव पिदूरकर यांच्यासह अन्य सहा शेतकरी या संकटाचा सामना करीत आहेत. सदर कामामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याकडेही बावणे यांनी यावेळी लक्ष वेधले. विरोध करायला गेले तर आम्हालाच धमक्या देत आहे. सदर कंत्राटदार कुणालाही जुमानत नाही. तक्रार द्यायला गेले तर पोलीस तक्रार घेत नाही, हा गंभीर आरोपही यावेळी केला.