बॉटनिकल गार्डनमध्ये साकारणार वनवृक्ष प्रजातींची जीन बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:11 AM2017-09-13T00:11:15+5:302017-09-13T00:11:15+5:30
येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भातील वनवृक्ष प्रजातीची जीन बँक निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच गार्डनची उभारणी करताना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भातील वनवृक्ष प्रजातीची जीन बँक निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच गार्डनची उभारणी करताना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनसचिव विकास खारगे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वनवृक्ष प्रजातीच्या या जीन बँकेचा उपयोग विद्यार्थी आणि संशोधकांना होणार असून त्यांना संशोधनासाठी आवश्यक असणाºया सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे सांगत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लखनौची नॅशनल बॉटनिकल रिसर्च लॅब्रोटरी ही देशातील बॉटनी या विषयात काम करणारी प्रमुख लॅब्रोटरी असून ती या जीन बँकेबरोबर चंद्रपूर बॉटनिकल गार्डनमध्ये कॅकटस गार्डन, बोनसाय गार्डन, डिहायड्रेटेड फ्लॉवर्स गार्डन या उपक्रमावर काम करत आहे.
चंद्रपूर बॉटनिकल गार्डनचे काम करताना इतर उपक्रमही अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने निवडून गार्डनेचे काम वेगाने पुढे न्यावे. या बॉटनिकल गार्डनमध्ये वन विभागाने औषधी वनस्पतींचे स्वतंत्र दालन निर्माण करावे तसेच या गार्डनचे काम करताना देशातील इतर बॉटनिकल गार्डन पहावेत, तिथल्या चांगल्या कल्पना येथे राबवाव्यात. केंद्र शासनाने अशा काही गार्डन देशात निर्माण केल्या आहेत का, याचा अभ्यास करावा, केले असल्यास यासाठी केंद्र शासनाकडून काही निधी मिळतो का, याचाही शोध घ्यावा. निधी मिळत असल्यास त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.
हे गार्डन पाहताना तिथे येणारा पर्यटक तीन ते चार तास तिथे रमला पाहिजे, त्याला आपण एक नवी सृष्टी पाहात आहोत, याचा आनंद मिळाला पाहिजे, अशा दृष्टीने गार्डनमधील कामे झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. वृक्ष प्रजातींप्रमाणेच विदर्भातील वन्यजीवांची माहिती येथे दिली जावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने गार्डनच्या कामांचा दर्जा उत्तम राहील, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बॉटनिकल गार्डनचे एक मोबाईल अॅप तयार करावे, त्यामाध्यमातून लोकांची-तज्ज्ज्ञाची मते आणि अपेक्षा मागवाव्यात, असेही ते यावेळी बैठकीत म्हणाले.
७० प्रजातीच्या वृक्षांची लागवड
वन विभागातर्फे या गार्डनमध्ये ६५०० खड्डे खोदण्यात आले असून त्यात ७० प्रजातींच्या रोपांची लागवड करण्याचे काम करण्यात येत आहे. १५०० बांबू रोपांची लागवड येथे झाली असून उर्वरित बांबू रोपवनाचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेल्या विविध कामांची सध्याची स्थिती, निविदा प्रक्रिया आणि कामाची गती यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.-